तारदाळ व खोतवाडी परिसरात जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेतील कामांमध्ये झालेली प्रचंड चालढकल, अपूर्ण कामे, आणि योजनेच्या अंमलबजावणीत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांचे निष्काळजी धोरण याविरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद दत्तात्रय कोराणे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण(hunger strike) सुरू केले आहे.

कोराणे यांनी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केल्याप्रमाणे तारदाळ व खोतवाडी येथील नागरिकांना विशेषतः महिलांना अनेक महिन्यांपासून पाण्याचा मोठा तुटवडा भोगावा लागत असून गावांमध्ये उकरलेले रस्ते तसेच पडून राहिलेली कामे ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करत आहेत.
पाण्याच्या अत्यंत गंभीर प्रश्नाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने आणि वारंवार निवेदन दिल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे ग्रामपंचायतीसमोर शांततामय मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून हे बेमुदत उपोषण(hunger strike) करण्याचा निर्णय घेतल्याचे कोराणे यांनी स्पष्ट केले आहे
योजनेच्या अंमलबजावणीत झालेली ढिलाई, रस्त्यांची दुर्दशा, अपूर्ण पाइपलाइन, वीज जोडणीचा अभाव आणि योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत न पोहोचण्याची स्थिती या सर्व बाबींना वाचा फोडत त्यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

मुख्य जलवाहिनीचे काम दानोळी ते तारदाळ फिल्टर हाऊस पर्यंत पूर्ण करावे, फिल्टर हाऊस ते वॉर्ड क्रमांक ७ पर्यंतच्या नळलाईनचे काम पूर्ण करावे, पाण्याच्या टाक्यांपासून वितरण पाइपलाइनची कामे वेळेत पूर्ण करावी, उकरून ठेवलेले रस्ते तात्काळ डांबरीकरण करावेत, योजनेशी संबंधित संपूर्ण दस्तऐवज ग्रामपंचायतीमध्ये सादर करावेत आणि अपयशी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
गावकऱ्यांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि योजनेतील भ्रष्टाचारास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत श्री. कोराणे यांनी आजपासून आपल्या आंदोलनाला सुरुवात केली असून ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा या आंदोलनाला मिळत आहे.
हेही वाचा :
अमेरिकेचा भारताला आणखी एक मोठा झटका…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद यशस्वी
सरकारी शाळेत शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! 7 हजार 466 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?