मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये रविवारी संध्याकाळपासून पावसाचा(Heavy rain) जोर वाढला असून, रात्रीभर विजांचा गडगडाट, वादळ आणि मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. हवामान विभागाने पुढील तीन तास ‘निर्णायक’ असल्याचा इशारा देत नागरिकांनी गरजेअभावी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सध्या मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, रायगड, नवी मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथा भागात पावसाची तीव्रता वाढली आहे.

मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत तर हार्बर मार्गावरील लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने पोहोचत आहेत. पश्चिम रेल्वे वाहतूक सुरळीत असली तरी मुसळधार पावसाने(Heavy rain) सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीलाही अडथळे निर्माण झाले आहेत.

मुंबईत रेड अलर्ट, कोकण आणि पुण्यासह इतर जिल्ह्यांनाही इशारा :
मुंबई शहर व उपनगरात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार पुढील तीन तासांत काही ठिकाणी वादळ आणि 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट लागू आहे.

अरबी समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असून परतीच्या पावसाचा हा टप्पा असल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत पावसाची तीव्रता हळूहळू कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शहरात ठिकठिकाणी पाणी साचले :
कुर्ला रेल्वे स्थानक, माटुंगा फाईव्ह गार्डन चौक, किंग्ज सर्कल, दादर टी टी आणि हिंदमाता-परेल परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत असून अंधेरी सबवे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ती गोखले ब्रीज मार्गे वळवण्यात आली आहे.

मोनोरेल वडाळा स्थानकाजवळ तांत्रिक कारणामुळे बंद पडली असून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासनाकडून तातडीने सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा कहर :
बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाने सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात मनमाड आठवडी बाजार पावसामुळे बाधित झाला असून भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोलीत मात्र एका तरुणाने पुरात वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याचे प्राण वाचवून धाडसाचे उदाहरण घालून दिले आहे.

हेही वाचा :

Bigg Boss 19: ‘बिग बॉस १९’ मधील पहिले डबल एव्हिक्शन पडले महागात, एकावेळी दोन स्पर्धक घराबाहेर

सावधान! एसी पंखे बंद असून सुद्धा सतत थंडी वाजते? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार

बॉक्स ऑफिसवर ‘दशावतार’चा धुमाकूळ; 3 दिवसांत तगडी कमाई, थिएटरमध्ये गर्दी