कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तची भगवी शाल अंगावर घातली गेल्यानंतर संबंधिताने दुसऱ्यासाठी आपली जागा रिक्त केली पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी काही महिन्यापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने केले होते(Political). नरेंद्र मोदी यांना उद्देशून त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले होते, अशी चर्चा तेव्हा सुरू झाली होती. त्यामुळे दिनांक 17 सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला जाईल असेही बोलले जात होते. मात्र नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस संपन्न झाला आणि त्यांनी पंतप्रधानपदाचा त्याग केलेला नाही. आता ते इसवी सन 2029 पर्यंत पंतप्रधान पदावर राहतील हे स्पष्ट झाले आहे.

बुधवारी नरेंद्र मोदी यांचा जल्लोषी वातावरणात देशभर वाढदिवस साजरा करण्यात आला. बुधवारी ते मध्य प्रदेश मध्ये होते, तेथीलच एका कार्यक्रमात त्यांचे भाषणही झाले. विशेष म्हणजे मैत्रीत दरार आलेल्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी खास दूरध्वनी करून नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अतूट राहतील अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. याशिवाय जगभरातील अनेक राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांना खास संपर्क साधून संवाद साधून शुभेच्छा दिल्या. भारतीय पंतप्रधानाच्या वाढदिवसाची दखल यापूर्वी अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली नव्हती.
इसवी सन 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन गोवा/पणजी येथे झाले होते आणि तेथे नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला आणि एन डी ए चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली कारकीर्द सुरू केली. इसवी सन 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत पुन्हा जोरदार मुसंडी मारली. आणि दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची माळ नरेंद्र मोदी यांच्याच गळ्यात पडली.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने ज्यांचे वय 75 झाले आहे अशांना पुन्हा राजकारणात संधी द्यायची नाही. त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायचे. असा ठराव केला होता. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुमित्रा महाजन, वगैरे अनेक ज्येष्ठांना राजकीय निवृत्ती स्वीकारावी लागली होती. इसवी सन 2025 च्या सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 75 व्या वर्षात पदार्पण करताहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला पाहिजे किंवा ते देतील अशी चर्चा सुरू झाली होती. एनडीए पेक्षा इंडिया आघाडीकडूनच अशा प्रकारची चर्चा मुद्दाम सुरू ठेवली होती. त्यात ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आघाडीवर होते(Political).

भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वयाची अट शिथिल केलेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी विरोधकांच्या अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला नाही.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान पदावर सलग तिसऱ्यांदा विराजमान होण्याचा मान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून घेतलेल्या धाडसी निर्णयाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झालेले आहे. पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी जसे कारगिल युद्ध जिंकले तसेच नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान बरोबरचे चार दिवसांचे अघोषित युद्ध जिंकले आहे. सामर्थ्यशाली देशाचा अत्यंत प्रभावशाली पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जाते.
नरेंद्र मोदी हे अनेकदा कोल्हापूरला येऊन गेले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते बाबा देसाई यांच्या चिरंजीवांच्या विवाह सोहळ्याला ते खास करून उपस्थित राहिले होते. सासणे मैदानावर झालेल्या एका भाषणात त्यांनी गुजरात आणि कोल्हापूर यांचे कनेक्शन कसे मधुर आहे हे विशद केले होते. कोल्हापूरचा गूळ हा सर्वाधिक गुजरातमध्ये प्रसिद्ध असल्याचे तेव्हा त्यांनी सांगितले होते. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात अतिशय आदर होता आणि म्हणूनच त्यांनी श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांना राज्यसभेचे सदस्यत्व दिले होते.
नरेंद्र मोदी हे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर आणि महाराष्ट्रावर विशेष प्रेम करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणा स्रोत आहेत आणि म्हणूनच मालवण येथे प्रथमच झालेल्या नौदलाच्या दिनानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरण समारंभाला ते खास करून आले होते. यापूर्वी नौदलाचा विशेष कार्यक्रम दरवर्षी नवी दिल्ली येथेच व्हायचा, पहिल्यांदा दिल्ली बाहेर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा घेतला गेला होता.नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून संपूर्ण देशामध्ये आदराचे स्थान मिळवलेले आहेच शिवाय जागतिक पटलावर त्यांनी आपले असामान्यत्व सिद्ध केले आहे. आणि म्हणूनच विकसित आणि अविकसित राष्ट्रांमध्ये नरेंद्र मोदी यांना आदराचे स्थान मिळालेले आहे.
हेही वाचा :
श्रिया पिळगांवकरने लग्नाबद्दल पहिल्यांदा केला खुलासा; म्हणाली
भर कार्यक्रमात महाराष्ट्र गीत सुरूच होईना, CM फडणवीस उठले अन्…पाहा व्हिडीओ
पावसाचा इशारा! १० जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी