कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: देवानं तोंड दिलय म्हणून काहीही बोलायचे काय? किंवा जिभेला काही हाड आहे की नाही? अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते तेव्हा समोरचा कुणीतरी काहीतरी बरळतोय किंवा भाषा सभ्यतेला दाढेखाली करकचून दाबून धरतोय असे समजावे. सर्वसामान्य माणसाकडून अशा प्रकारची हिणकस पातळीवरील कधीतरी वापरली जाते. पण सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून सभ्यतेचा कडेलोट झाला तर त्याला नक्कीच अक्षम्य समजले जाते. भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्ह्यातील आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच शिवराय आणि एखाद्याचे चारित्र्यहनन होईल अशी भाषा वापरण्यासाठी राज्यात कुप्रसिद्ध आहेत. सांगलीचे विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्या विषयी बोलताना त्यांनी जी भाषा वापरली आहे तिचे कोणीही समर्थन करू शकणार नाही(Political).

त्यांनी वापरलेली अश्लाघ्यभाषा अक्षम्य अशा प्रकारची आहे.सहा सात वर्षांपूर्वी गोपीचंद पडळकर हे नाव महाराष्ट्राला माहीतसुद्धा नव्हतं. महाविकास आघाडीचसरकार असताना एसटी महामंडळातील कामगार कर्मचाऱ्यांचा संप झाला होता. राज्य शासनाचे कर्मचारी म्हणून एसटी महामंडळातील कामगार कर्मचाऱ्यांना मान्यता द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होते आणि तेव्हा या आंदोलनाचे नेतृत्व गुणरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केले होते. त्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षाने आपलेसे केले होते. शरद पवार तसेच जयंत पाटील यांच्या विरुद्ध सातत्याने बोलणारा ही एकमेव पात्रता
समजून त्यांना पक्षात घेतले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर जत विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत.


धनगर समाजाचे नेते आणि उत्तम वक्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.त्यानंतर फटकळ बोलणारा फाटक्या तोंडाचा म्हणून, भाषा सभ्यतेला फासावर लटकवणारा म्हणून, शिवराळ भाषा वापरणारा म्हणून त्यांची ओळख झाली.एखाद्या राजकीय नेत्याबद्दल, किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या धोरणाबद्दल, एखाद्या नेत्यानेअश्लाघ्य किंवा असभ्य भाषा वापरली किंवा मत व्यक्त केले तर संबंधित राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते”हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे, त्यांच्या मताशी आणि भाषेशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही”असा खुलासा करत असत. पण आता तेवढीही सभ्यता महाराष्ट्राच्या राजकारणात राहिलेली नाही असे खेदाने म्हणावे लागेल.आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही महिन्यांपूर्वी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांच्या खाजगी आयुष्याशी निगडित असलेल्या विषयावर बोलताना अतिशय गलिच्छ भाषा वापरली होती. तेव्हाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पडळकर यांना योग्य ती समज दिलेली नव्हती(Political).


दोन दिवसापूर्वी जत मध्ये बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर अतिशय घाणेरड्या भाषेत टीका केली होती. ऐकणाऱ्याला सुद्धा ती पसंत पडलेली नसावी. राजकारणात नेत्यांमध्ये मतभेद असतातच. जयंत पाटील आणि पडळकर हे दोघेही एकाच जिल्ह्यातील आहेत. ते वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यात वैचारिक मतभेद असणे समजू शकते. पण व्यक्तिगत मतभेद असल्याचे काहीच कारण नाही किंवा नसावे. तर मग सामान्य माणूस सुद्धा बोलताना दहा वेळा विचार करेल अशी भाषा त्यांच्याकडून वारंवार कशी बोलली जाऊ शकते? गोपीचंद पडळकर हे फार मोठे विचारवंत आहेत, तत्त्वचिंतक आहेत, त्यांनी समाजासाठी फार मोठे योगदान दिलेले आहे, अशी
पार्श्वभूमी त्यांना नाही.


जयंत पाटील यांच्या बद्दल, त्यांचे चारित्र्यहनन होईल अशी भाषा वापरल्यानंतरही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, तसेच देवेंद्र फडणवीस वगैरे नेत्यांनी त्यांना फटकारलेले नाही, कडक शब्दात समज दिलेली नाही, पडळकर बोलले ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे, पक्षाशी त्याचा काही संबंध नाही अशा प्रकारचा खुलासा केला गेलेला नाही याचा अर्थ शरद पवार कुटुंबीयांवर किंवा जयंत पाटील यांच्यावर त्यांच्याकडून बोलली गेलेली गलिच्छ भाषा ही भारतीय जनता पक्षाला मान्य आहे असा होतो. काल-परवापर्यंत साधनशुचिता पाळणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख होती. आता ती राहिलेली नाही असे म्हणावे लागेल.
‌ शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध केलेले आंदोलन हे योग्यच आहे. असे म्हणणे चुकीचे होणार नाही.

हेही वाचा :

आयफोन 17 साठी नागरिकांमध्ये मारामारी, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
या’ कारणामुळे झाले नाही लग्न कोण आहे हि अभिनेत्री…
नवरात्री फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा, ‘या’ दुचाकींवर होईल हजारोंची बचत