कोल्हापूर,/विशेष प्रतिनिधी : मराठवाडा म्हणजे दुष्काळ पाचवीला पुजलेला. त्यावर मात करून शिवारात काही पेरलं, ते बऱ्यापैकी उगवलं तर कृषी उत्पादनाचे दर कोसळलेले. उत्पादन खर्च निघणार नाही अशी स्थिती. कर्ज फेडायचं कसं? जित्राब जगवायची कशी? पोटाला खायचं काय? हा प्रश्न प्रत्येकाला”खायला”उठलेला. यंदाच्या पावसाळ्यात वेगळच घडलय. शिवारत्न पाणी हटायला तयार नाही. पाण्याखालची पिके(Crops) कुजून गेलेली . ती काढून टाकण्यासाठी पुन्हा खर्च . मराठवाड्याचा शेतकरी हतबल झालाय. ओला दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्याला थोडाफार धीर येईल, त्याला दिलासा मिळेल.

मराठवाड्यातील दुष्काळी जिल्ह्यांना दक्षिण महाराष्ट्रातील पुराचे पाणी वळवायचे हा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महत्वकांक्षी प्रकल्प राबवला जाणार आहे. त्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि कधी नव्हे इतका पाऊस तेथे कोसळू लागला आहे. शेताची तळी झालेली पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. जणू कोसळधारांनी त्याच्याशी नशीबाचा खेळ मांडला आहे.””ओंजळभर पाऊस पडला तर, कवळभर पीक(Crops) काढू. चिखलातून अंकुर उगवला तर कुबेराला सुद्धा भीक वाढू.””असं म्हणणारा शेतकरी आज आभाळ फाटल्यानंतर रडू लागला आहे.यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा आणि एकही तालुका नाही की तेथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना तीन चार वेळा पूर येऊन गेला आहे. कोकणातील नद्यांनी दोन दोन वेळा धोक्याची पातळी ओलांडली आहे.एकापेक्षा अधिक वेळा पात्राच्या बाहेर पडणाऱ्या नद्यांनी जनजीवन विस्कळीत करून टाकले होते. महापुराच्या पाण्याने घरांची पडझड झालेली आहेच शिवाय जीवित हानी सुद्धा झालेली आहे. मुंबईतील असा एक भाग नव्हता की तिथे पावसाच्या पाण्याचे फूटभर पाणी नव्हते. मिठी नदीने कहर केला होता. मुंबई या पावसाळ्यात अनेकदा तुंबली होती.यंदाच्या पावसाने सर्वसामान्य जनतेच्या छातीत धडकी भरली होती. विशेषतः मराठवाड्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि आजही त्यात फारसा बदल झालेला नाही.
मराठवाडा म्हणजे दुष्काळ आणि आज याच मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून राज्य शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ,वाशिम, हिंगोली वगैरे जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. पेरलेले रान उध्वस्त झाले आहे. विशेषतः सोयाबीन शेतातच कुजला आहे. आता तोंडाशी आलेले पीक(Crops) अशा प्रकारे डोळ्यासमोर कुजलेले पाहून शेतकरी रडतो आहे.पेरणीसाठी एकरी शेतकऱ्याने 20 ते 25 हजार रुपये खर्च केला आहे आणि तो आता अक्षरशः पाण्यात गेला आहे. राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला तरी जास्तीत जास्त हेक्टरी आठ ते नऊ हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल पण त्यातून कुजलेले पीकही काढता येणार नाही कारण नुकसान भरपाईची रक्कम आणि कुजलेले पीक शेतातून काढण्याचा होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही.

सध्या माघारीचा पाऊस सुरू आहे. मराठवाड्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाने शेतकऱ्यांना रडकुंडीस आणले आहे.
उध्वस्त झालेला शेतकरी आत्महत्येच्या मार्गाकडे वळू नये यासाठी राज्य शासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत. उध्वस्त शेतकऱ्यांच्या पाठीमागे राज्य शासन खंबीरपणे उभा आहे असे चित्र निर्माण झाले पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे यासाठी राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला होता. अजून त्याचा निर्णय झालेला नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्ज आणखी वाढले आहे. राज्य शासनाने केंद्राकडे आर्थिक सहाय्य मागितले पाहिजे.अडचणीत आलेल्या शेतकऱ्याची हालत पाहण्यासाठी आता कुठे राज्य शासनातील मंत्री आपल्या गावाकडे जाऊ लागले आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठीमदत घेऊन जात आहेत.या मंत्र्यांनी तसेच स्थानिक आमदारांनी, खासदारांनी प्रत्यक्ष शिवारापर्यंत जाऊन उद्ध्वस्त झालेली पिके पहिली पाहिजेत. त्यामुळे त्यांना गांभीर्य कळेल आणि ते केंद्र शासनाकडे आर्थिक साह्याची मागणी लावून धरतील.
हेही वाचा :
कोण आहे ही लैला जिच्यासाठी अभिषेक शर्मा झाला मजनू, जाणून घ्या…
8 वर्षांच्या मुलीच्या तोंडात अडकला च्युइंगम Video Viral
आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजसह खरेदी करा हे महत्त्वाचे स्टॉक्स,