कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : केंद्र शासनाने ऑनलाईन जुगारावर, युवा पिढीचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या गेम वर बंदी आणली आहे. या आदेशावरील स्वाक्षरीची शाही वाळण्याच्या आधीच राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री(Minister) नितेश राणे यांनी त्यांच्या जिल्ह्यातच कणकवली येथे ऑफलाइन चालणाऱ्या मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकली.”मंत्री, इलोरे!” मनात पळून जाण्याची कुणालाही यावेळी संधी मिळाली नाही.

पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय “ओपन आणि क्लोज” सारखा मटका जुगार चालू शकत नाही हे सर्व सामान्य माणसाला कळालेले वास्तव मंत्री महोदयांना माहीत नाही असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल. पण त्याचबरोबर गृह खाते हे आपले बॉस देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि त्यांच्याच खात्याचे आपण वस्त्रहरण करून विरोधकांना टीका करण्यासाठी एक मजबूत मुद्दा देतोय हे मात्र ते विसरलेले दिसतात.
सुमारे 60 वर्षांपूर्वी मुंबई कॉटन मार्केट च्या तेजी मंदीवर जुगार खेळला जायचा. त्यानंतर रतन खत्री याने मुंबईत “मुंबई मटका” या नावाने 52 पानातील तीन पानांच्या माध्यमातून मटका जुगार सुरू केला. त्यानंतर मुंबईच्या वरळी भागात रस्त्यावर फिरून भडंग विकणाऱ्या कल्याण भगत याने मुंबई मटक्याच्या धर्तीवर “वरळी मटका” सुरू केला आज तो राज्यभर आणि संपूर्ण देशात कल्याण मटका या नावाने ओळखला जातो. हा मटका जुगार म्हणजे एक प्रकारची संघटित आर्थिक गुन्हेगारी आहे. हा ऑफलाईन खेळला जाणारा मटका जुगार आजतागायत केव्हाही बंद पडलेला नाही.
कितीही कठोर गृहमंत्री (Minister)असो किंवा कितीही कठोर पोलीस अधिकारी असो त्यांना हा ऑफलाईन जुगार बंद करता आलेला नाही त्याला गृहमंत्री असलेल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही अपवाद नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे की पोलीस प्रशासनाने प्रामाणिकपणाने हा ऑफलाइन जुगार बंद करायचा निर्धार किंवा निर्णय केला तर तो कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. तथापि दुर्दैवाने हा ऑफलाईन जुगार चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारांनी बहुतांशी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अर्थकारणाशी जोडले आहे. आणि म्हणूनच हा मटका जुगार सुरू आहे.
मुंबई मटका सुरू करणारा रतन खत्री मरण पावल्यानंतर सावला नामक त्याच्या नातवाने या मटक्याच्या धंद्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. पण तोही सध्या तुरुंगात आहे. अभिनव देशमुख नावाचे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक होते त्यांनी सावला याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली आहे आणि अजूनही त्याला जामीन मिळालेला नाही तरीही मुंबई मटका सुरू आहे. कल्याण मटक्याचा मालक कल्याण भगत यांचे निधन झाल्यानंतर त्याच्या मुलाकडे या धंद्याची सूत्रे आली होती. त्याचीही हत्या त्याच्या पत्नीनेच सुपारी देऊन केली होती. पण तरीही कल्याण मटका आजही सुरू आहे.
असा एकही जिल्हा नाही आणि असे एकही गाव नाही की जिथे मटका जुगार सुरू नाही. मटका जुगारणे संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. फक्त मुंबई शहरात मुंबई कल्याण सह विविध प्रकारच्या मटका आकड्याच्या मुख्य सूत्रधारांची संख्या 600 आहे आणि मटका घेणाऱ्या छोट्या छोट्या केंद्रांची संख्या एकट्या मुंबईत सात हजार पेक्षा अधिक आहे. यावरून मटका जुगाराचे व्यापक स्वरूप लक्षात येईल. मटका जुगार रोज शेकडो कोटी रुपयांची उलाढाल एका साध्या कागदावर लिहिलेल्या आकड्यावरून होते.
कोल्हापूर जिल्ह्यातही रोज कितीतरी कोटी रुपयांची उलाढाल या मटका जुगारात होत असते. आर के पद्मनाभन नावाचे काही वर्षांपूर्वी एक पोलिस अधीक्षक कोल्हापूरला होते. त्यांनी जिल्ह्यातील मटका व्यवसायातील मुख्य 17 सूत्रधारांना एकाच वेळी अटक केली होती.
राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणेच कोकणातही ऑफलाइन मटका जुगार राजरोस सुरू आहे हे मंत्री(Minister) असलेल्या नितेश राणे यांना माहीतच नाही असे म्हणता येणार नाही. कणकवली शहराचा मटका जुगाराचा प्रमुख सूत्रधार कुणी घेवारी नावाचा गृहस्थ आहे. तो हा जुगार अगदी उघडपणे चालवायचा. राणे यांनी टाकलेल्या धाडीत तीन लाख रुपये जप्त करण्यात आले.

नितेश राणे यांनी मटका जुगारावर धाड टाकली असली तरी कणकवली तसेच कोकणातील हा जुगार बंद होणार नाही. त्यामुळे त्यांनी टाकलेल्या धाडीकडे एक पॉलिटिकल स्टंट म्हणता येईल. कणकवली शहरातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या इकडे तिकडे बदल्या होतील. यापेक्षा वेगळे काही घडेल असे वाटत नाही.
इसवी सन 1982 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी तत्कालीन शिवसेनेचे आमदार प्रमोद नवलकर यांच्या सह मुंबईतील भूमिगत जगताची विना सुरक्षा पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी काही निर्णय घेतले पण भूमिगत जगत जरा सुद्धा इकडचे तिकडे झाले नाही. आणि म्हणूनच नितेश राणे यांनी अवैध धंद्याविरुद्ध केलेल्या कारवाईवरून अवैध धंदे बंद होतील ही शक्यता नाही.
हेही वाचा :
ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका
पोलीस असल्याचे भासवत दिवसाढवळ्या अपहरण
ढगफुटीने विनाश, घरांची मोडतोड, लोकंही गायब…..