कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

सोन्याचे (Gold)आणि चांदीचे दर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढतच चालले आहेत. चांदीचा प्रति किलोचा दर दोन लाखाच्या दिशेने चालला आहे तर सोन्याचा दहा ग्रॅम चा दर एक लाख तीस हजाराकडे पोहोचताना दिसतो आहे. त्याचा प्रतिकूल फटका अनेक उद्योगांना बसणार आहे. आणि बसू लागला आहे. सोने आणि चांदी या धातूंचा वापर दागिने व वस्तू बनवण्यासाठीच प्रामुख्याने केला जातो असे नाही तर अनेक औद्योगिक व औषधी उत्पादनासाठी त्याचा वापर केला जातो. सोन्याची दर वाढ म्हणजे गुन्हेगारांना”सुवर्णसंधी”असल्याने जबरी चोऱ्या, वाट मारी, घरफोड्या,दरोडे या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याचे धोके दिसत आहेत.जबरी चोऱ्या म्हणजे महिलांच्या अंगावरील प्रामुख्याने गळ्याभोवतीचे सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाण्याचे गुन्हे होत आहेत. पण आता त्यात वाढ होणार आहे. हे गुन्हे टाळण्यासाठी किंवा होऊच नयेत म्हणून खबरदारी घेण्याची खरी जबाबदारी महिलांच्यावर आहे. सोन्याचे दागिने त्यांनी घालूच नयेत.


सौभाग्य अलंकार म्हणून मनी मंगळसूत्र घालावे पण तेही बेन्टेक्स धातूचे असावे. मोटर सायकल वरून जाऊन महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेऊन पळून जाणाऱ्या गुन्हेगारांच्या हातात बेन्टेक्सचे दागिने पडत असतील तर असे गुन्हेच त्यांच्याकडून होणार नाहीत. पण खोटे दागिने घालण्याची उमज महिलांना आली पाहिजे आणि ती आवश्यक आहे.
आता वाट माझी गुन्हे वाढतील. रात्री अपरात्री वाट अडवून अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले जातील. पुरुषांनाच अशा वाटमारी प्रसंगाला सामोरे जावे लागते. हाताच्या बोटावरील अंगठ्या, गळ्याभोवतीची सोनसाखळी असे दागिने लुटले जातील. त्यासाठी अंगावर सोन्याचे अलंकार मिरवायचे नाहीत असा निर्णय प्रत्येकाने घेतला तर अशा वाटमाऱ्या होणार नाहीत. फार फार तर खिशात असलेली रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागेल.


बहुतांशी लोक सोन्याचे(Gold) दागिने घरातच ठेवतात. बँक लॉकर ची सुविधा फार कमी लोक घेतात. त्यामुळे गुन्हेगार घरफोड्यांचे सत्र सुरू करतील, तसे प्रकार सुरूही झाले आहेत. चोरलेले दागिने खिशात घालून गुन्हेगारांना सहज पळून जाता येते. चोरट्यांना साधी दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी मिळाली तरी तिचे रूपांतर एक लाख रुपयात होते. चोरटे रिकाम्या हाताने परत जाणार नाहीत.सोन्याच्या आणि चांदीच्या दराचा वाढता आलेख हा औद्योगिक आणि औषधी उत्पादनावर प्रतिकूल परिणाम करणार आहे. काही आयुर्वेदिक औषधांमध्ये सोन्याचा अंश असतो. सुवर्णभस्म आपल्याला माहीतच आहे. दवाखान्यात एक्स-रे काढण्यासाठी चांदीचे मिश्रण असलेल्या द्राव वापरला जातो. एक्स-रे साठी वापरलेले हे पाणी दरवर्षी टेंडर काढून विकले जाते.

कारण या पाण्यामध्ये चांदी असते. आता चांदीचे दर वाढल्यामुळे एक्स-रे काढण्याचा दरही वाढेल. त्याचा फटका रुग्णांना बसेल.
उत्तर भारतातील काही जिल्ह्यांमध्ये काचेच्या बांगड्या बनवण्याचे कारखाने आहेत. प्रत्येक भारतीय स्त्री हातामध्ये काचेच्या बांगड्या घालते. अशा काचेच्या बांगड्या बनवण्यासाठी सोन्याचा वापर करावा लागतो.सोन्याचे दर भविष्यात वाढतील हा दूरदृष्टीकोन ठेवून.ज्यांनी काही वर्षांपूर्वी सोने खरेदी केले असेल त्यांचा सोन्याच्या दर वाढीमुळे अमाप फायदा झालेला आहे. पस्तीस ते चाळीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅम असा सोन्याचा दर होता तेव्हा सातवा वेतन आयोगाचा फरक घेणाऱ्या बहुतांशी सरकारी कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या पैसा सोन्यात गुंतवलेला आहे. त्यांचे उखळ पांढरे झाले आहे. ज्यांनी वर्षांपूर्वी सोने गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतले आहे.त्यांच्यासाठी सोन्याचे वाढलेले दर अतिशय फायदेशीर ठरलेले आहेत.


मुळातच सोन्याचे दर जगभरात वाढलेले आहेत.अमेरिकेमध्ये सोन्याचे दर 48 टक्क्यांनी वाढले आहेत तर युरोपीय राष्ट्रांमध्ये सोन्याचे दर 38 टक्क्यांनी वाढले आहेत आणि भारतात मात्र सोन्याचे दर 140 टक्क्यांनी वाढले आहेत. सोन्याचा दर वाढीचा सर्वाधिक फटका भारतीय ना बसला आहे. आणि त्याला कारण आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरलेले मूल्य होय.डॉलरची श्रीमंती कमी करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांनी एकत्र येऊन डॉलरला पर्याय दिला पाहिजे. जागतिक स्तरावर डॉलरचे मूल्य कमी झाले तर त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे.सोन्याचे आणि चांदीचे गगनाला दर भिडलेले आहेत.त्याचा प्रतिकूल परिणाम सराफ बाजारपेठेवर झालेला आहे. ग्राहकच नसल्यामुळे व्यापार थंडावला आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम सुवर्ण कारागीर आणि चांदी कारागीर कुटुंबावर होताना दिसतो आहे.

हेही वाचा :

सलमान खानने मित्राच्या फॅशन शोमध्ये पहिल्यांदाच केला रॅम्प वॉक…
हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड माहिका शर्माकडे ‘Good News’…
साजशृंगार केला, फुगे घेतले अन् क्रेनला लटकून कपलने केलं अनोखं शूट; Video Viral