कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

राजकारणात मतांची पेरणी करण्यासाठी कोणते विषय रडारवर घ्यायचे? ते चर्चेत कसे आणायचे? यासाठी एक चाणाक्ष आणि धुरंदर गट काम करत असतो.हा गट पडद्याआड असतो आणि तो अनेकांना पडद्यावर(रस्त्यावर) आणत असतो. त्यासाठी युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळलाच पाहिजे(reason) असे काही नसते. मुंबई आणि आसपासच्या महापालिका निवडणुका समोर ठेवून मतांची जातनिहाय विभागणी करण्यासाठी मुंबईतील कबूतरखाने चर्चेच्या रडारवर आणले गेले होते. जैन, मारवाडी हे मुंबईतील कबूतरखाने हलवायचे नाहीत किंवा बंद करावयाचे नाहीत यासाठी महापालिका प्रशासनाच्या विरोधी रस्त्यावर उतरले होते. या विषयावर मुंबई व शेजारच्या शहरात जातनिहाय, समाजनिहाय मत विभागणी झालेली आहे. आता मुंबईतला प्रयोग पुणे शहरात सुरू आहे. जैन समाज विश्वस्त मंडळाची करोडो रुपये किंमतीची जागा विश्वस्त मंडळाने विकली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित असलेल्या एका कंपनीने जैन समाजाची ही जागा बाजारभावापेक्षा कमी दरात विकत घेतली आहे

आणि हा स्वस्तातला व्यवहार करण्यासाठी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अप्रत्यक्षपणे विश्वस्त मंडळावर दबाव आणला आहे आणि म्हणूनच मंत्री मंडळातून त्यांना काढून टाकण्यात यावे अशी मागणी जैन समाजाकडून जोरात केली जाऊ लागली आहे. खुद्द जैन मुनीनी या जमीन विक्री व्यवहारास विरोध केला आहे. आता राज्यातील विरोधी पक्षांनी या जमीन विक्री खरेदी प्रकरणात उडी घेतली असून हा व्यवहार रद्द झाला(reason) पाहिजे अशी मागणी केली आहे.जमीन विक्री प्रकरण गाजत आणि वाजत असताना शनिवार वाड्यातील नमाज पठण प्रकरण भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभा खासदार मेघा कुलकर्णी यांनी बाहेर काढले आहे. ऐतिहासिक शनिवार वाडा हा कायमस्वरूपी संवेदनशील विषय आहे. छत्रपतींचे प्रधान मंत्री असलेल्या पेशव्यांचा तेथे रहिवास होता.”ध” चा ” मा”इथेच झाला. नारायणाचा वध इथेच झाला.


“काका मला वाचवा’ ही‌आर्त हाक याच वाड्यातील दगडी भिंतींनी ऐकलेली आहे. मस्तानी याच शनिवार वाड्याचा एक भाग बनली होती. मोघलांच्या विरोधात अनेक लढायांचे नियोजन याच वाड्यात करण्यात आले होते. “कटक’ पासून “अटक’ पर्यंत विजयाची घोड दौड इथूनच सुरू झाली. शनिवार वाडा ही वास्तु ‌आता पर्यटन स्थळ बनली आहे. शनिवार वाड्याच्या आत मधील प्रशस्त परिसरात एका बाजूला काही महिला नमाज पठण करत आहेत असा एक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्याची दखल भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली. त्यांनी या घटनेचा निषेध केला. आणि हे प्रकरण चर्चेत आणले. आता या नमाज पठणाचे समर्थन महायुती मधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली चाकणकर यांनी केले आहे.
शनिवार वाडा हा काही मेधा कुलकर्णी यांच्या बापाची प्रॉपर्टी नाही. ते आमच्या बापाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे.


असे सांगत रूपाली चाकणकर यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर जहाल भाषेत टीका केली आहे. या महिलांना मुद्दाम तेथे नमाज पठण करण्यास सांगितले असावे किंवा त्या मुस्लिम नसाव्यात. असे त्यांचे म्हणणे आहे. तर जैन धर्मियांची जागा विक्री प्रकरण चर्चेतून विस्मरणात जावे हा हेतू ठेवून शनिवार वाड्यातील हे प्रकरण मुद्दाम घडवून आणण्यात आले आहे असा दावा ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे गटाचे विजय धंगेकर यांनी जैन धर्मीय विश्वस्त मंडळाच्या मालकीच्या जागेचा खरेदी विक्री व्यवहार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या दबावातून झालेला आहे आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यावर भारतीय जनता पक्षाचे कोणी श्री. भिमाले यांनी धंगेकर यांना “पुण्यातला भटका कुत्रा’ असे म्हटल्याने प्रकरण चिघळले आहे.

महायुती मधील एक मंत्री नितेश राणे यांनी शनिवार वाड्यामध्ये मुस्लिमांना नमाज पठण करता येत असेल तर मग हाजी मलंग दर्ग्यामध्ये हनुमान चालीसा म्हणायला परवानगी द्यावी लागेल आणि ते चालेल का असा सवाल उपस्थित केला आहे. एकूणच पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेची तसेच पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक समोर ठेवून हे मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत. मतपेढी भक्कम करणे हा त्यांचा प्रधान हेतू आहे असे कोणी म्हटले तर त्यात वावगे म्हणावे असे काही नाही. आता महाराष्ट्रातील आणखी काही महानगरामध्ये असेच संवेदनशील विषय मुद्दाम बाहेर काढले जातील. असे विषय बाहेर काढण्यासाठी पडद्यामागील काही गट सक्रिय असतात किंबहुना त्यांना अशाच कामासाठी नियुक्त केलेले असते(reason). सर्वसामान्य मतदारांना एखाद्या संवेदनशील विषयांमध्ये गुंतवून ठेवायचे. विषय सतत काही दिवस चर्चेत ठेवून त्याचे रूपांतर मतांमध्ये करायचे. मुंबईत कबुतरांच्या विषयावरून हेच घडले आहे आणि आता पुण्यातही शनिवार वाडा, जैन समाज विश्वस्त मंडळाची जागा विक्री प्रकरण यातून हवे तेच घडवायचे आहे.

हेही वाचा :

हवामान खात्याचा पावसाचा इशारा…
व्यवसायात अपेक्षित यश मिळविण्यासाठी करा हे उपाय
Royal Enfield Meteor 350 की Yezdi Roadster,