महाराष्ट्रातील गाजलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण(Ladki Bahin) योजनेत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पडताळणीत दुबार नावे व अपूर्ण पात्रता निकष असलेल्या तब्बल १६०० महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, येत्या काळात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखी वाढू शकते.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना जाहीर करताना पात्र महिलांना दरमहा ₹१५०० थेट बँक खात्यात जमा करण्याची तरतूद केली होती. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांना लाभ मिळतो. मात्र, लाभासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असावे, चारचाकी वाहन नसावे आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांनाच हा लाभ देता येईल, अशा अटी स्पष्ट करण्यात आल्या होत्या.
तथापि, अनेक लाभार्थ्यांनी चुकीची माहिती देऊन योजना घेतल्याचे समोर आल्याने प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू आहे. स्थानिक स्तरावरच्या या तपासणीत अनेक अपात्र लाभार्थ्यांना(Ladki Bahin) वगळण्यात आले आहे.दरम्यान, राज्य सरकारने सध्या ई-केवायसी प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे. निवडणुकीत ही योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरल्याने आणि महिला मतदारांची नाराजी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. दिवाळीनंतरही ‘भाऊबीज’ म्हणून ओळखला जाणारा हा हप्ता मिळालेला नसल्याने प्रतीक्षा वाढली आहे. मात्र, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
सलमान खानला पाकिस्तानने दशहतवादी का घोषित केलं…
पुढील ४८ तास धोक्याचे! मुसळधार पावसाचा इशारा…
शरद पवार गटातील ज्येष्ठ नेत्याच्या घरी चोरटयांचा दरोडा…