माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसीबाबत गोंधळ निर्माण झाल्याने सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात महिलांची सेतू केंद्रांवर प्रचंड गर्दी होत आहे. “ई-केवायसी(e-KYC) न केल्यास पैसे मिळणार नाहीत” अशी अफवा पसरल्यानंतर अनेक लाभार्थी महिला तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धाव घेत आहेत. दरम्यान, ई-केवायसीची अंतिम तारीख १८ की ३० नोव्हेंबर याबाबत संभ्रम कायम असून यामुळे महिलांमध्ये गोंधळ उडाला आहे.

राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने यापूर्वी ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली होती, मात्र बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, १८ नोव्हेंबरपर्यंत केवायसी प्रक्रिया सुरू राहणार आहे. तसेच विधवा आणि घटस्फोटित महिलांच्या बाबतीत शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. सध्या ई-केवायसीसाठी दोन आधार क्रमांक आवश्यक असल्याने विधवा आणि घटस्फोटित महिलांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. मृत पावलेल्या पतीच्या आधारकार्डशी मोबाइल नंबर लिंक नसल्याने त्यांची प्रक्रिया अडखळत आहे.

महिलांना घरबसल्या ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध असून, आपल्या मोबाईलवरील Google Chrome ब्राउझरमध्ये “माझी लाडकी बहीण ई-केवायसी” असे शोधल्यास थेट https://ladakibahinyojana.co.in/ekyc या संकेतस्थळावर प्रवेश करता येतो. येथे स्वतःचा तसेच पतीचा अथवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून प्रक्रिया पूर्ण करता येते.प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळावरूनच ई-केवायसी(e-KYC) प्रक्रिया पूर्ण करावी आणि सेतू केंद्रांवरील अनावश्यक गर्दी टाळावी.

हेही वाचा :

फक्त 6522 रुपयांच्या EMI वर मिळेल Tata Motors ची ‘ही’ लोकप्रिय कार
महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचा उद्धव ठाकरेंना जबर धक्का
पांढरे केस, टोकदार कान अन् घारे डोळे… आढळली सर्वात दुर्मिळ मांजर! हिच्या दृश्यांनी सर्वांनाच केलं घायाळ; Video Viral