बॉलिवूडचे(Bollywood) ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. वयाच्या 88व्या वर्षात प्रवेश केलेले धर्मेंद्र यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून, ही केवळ नियमित तपासणीचा भाग असल्याचं कुटुंबीयांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कुटुंबातील सूत्रांनी सांगितलं की, ‘धर्मेंद्र यांच्या आरोग्यात कोणतीही गंभीर अडचण नाही. वयाचा विचार करता डॉक्टरांनी केवळ तपासणी आणि विश्रांतीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल राहण्याचा सल्ला दिला आहे.’ त्यामुळे चाहत्यांनी काळजी करण्याचं काहीच कारण नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून ‘गेट वेल सून’च्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काही जणांनी त्यांच्या जुन्या चित्रपटातील दृश्ये शेअर करत ‘ही-मॅन लवकर परत येईल’ असं लिहिलं आहे.
अलीकडेच धर्मेंद्र आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिसले होते. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या ‘इक्कीस’ या चित्रपटात धर्मेंद्र हे अभिनेता अगस्त्य नंदाचे आजोबा साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट पॅराम व्हिर चक्र विजेते अरुण क्षेत्रपाल यांच्या आयुष्यावर आधारित असून यात धर्मेंद्र यांचं महत्त्वाचं आणि भावनिक पात्र आहे.
धर्मेंद्र यांनी 1960च्या दशकात बॉलिवूडमध्ये(Bollywood) पदार्पण केलं आणि ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सीता और गीता’, ‘अनपढ़’, ‘धर्मवीर’, ‘ड्रीम गर्ल’ यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांची जोडी हेमा मालिनीसोबत विशेष गाजली. त्यांच्या अॅक्शन आणि रोमँटिक भूमिकांमुळे त्यांना ‘ही-मॅन ऑफ बॉलिवूड’ ही उपाधी मिळाली. धर्मेंद्र हे फक्त एक यशस्वी अभिनेता नाहीत, तर एक संवेदनशील माणूस म्हणूनही ओळखले जातात. आजही ते सोशल मीडियावर सक्रिय राहून आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या शेतातील फोटो शेअर करत “निसर्गात राहणं हीच खरी शांती आहे” असं कॅप्शन दिलं होतं.
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबाकडून अद्याप अधिकृत निवेदन आलेलं नाही. मात्र, जवळच्या सूत्रांच्या मते, त्यांची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून पुढील एक-दोन दिवसांत त्यांना घरी सोडण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांकडून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. धर्मेंद्र पुन्हा एकदा जोशात मोठ्या पडद्यावर दिसावेत, अशीच सर्वांची इच्छा आहे.
हेही वाचा :
आधार कार्डबाबत हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
10 जणांकडून महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, आत्महत्या करणार इतक्यात…
चक्रीवादळाचा राज्यावर होणार परिणाम, पुढील चार दिवस पावसाचा अंदाज