बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोड्यांपैकी एक असलेले कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच पालक होणार आहेत. लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर दोघंही त्यांच्या पहिल्या अपत्याचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या कतरिनाचा प्रसुती काळ जवळ आला असून, ती मुंबईतील आपल्या घरातच कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. पण या शांततेच्या काळातच एक धक्कादायक घटना घडली आहे. झूम टीव्हीने गरोदर कतरिनाचे बाल्कनीत आराम करतानाचे खासगी फोटो लीक केल्याने सोशल मीडियावर(social media) मोठी खळबळ उडाली आहे.

कतरिनाचे हे फोटो सार्वजनिक झाल्यानंतर चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. सोशल मीडियावर (social media) #RespectKatrina हे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले असून, अनेकांनी संबंधित मीडिया पोर्टलवर टीका केली आहे. अनेक चाहत्यांनी लिहिलं, “गरोदर स्त्रीच्या खासगी क्षणांवर डोकावणं म्हणजे लज्जास्पद आहे. मीडिया इतकी खालच्या पातळीवर कशी जाऊ शकते?” काहींनी तर या प्रकरणात पोलीस कारवाईची मागणी केली आहे.

या घटनेवर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. झूम टीव्हीच्या पोस्टवर कमेंट करत ती म्हणाली ‘तुम्हाला काय झालं आहे???? तिच्याच घरात एका महिलेचे तिच्या संमतीशिवाय फोटो काढणे आणि ते सार्वजनिक व्यासपीठावर शेअर करणे? हे पूर्णपणे लज्जास्पद आहे. तुम्ही लोक गुन्हेगारांपेक्षा कमी नाही!’सोनाक्षीच्या या वक्तव्याला चाहत्यांकडून प्रचंड पाठिंबा मिळत असून, अनेकांनी तिच्या निर्भीड भूमिकेचं कौतुक केलं आहे.

सप्टेंबर महिन्यात कतरिनाने सोशल मीडियावर एक गोड फोटो शेअर करत आपल्या गरोदरपणाची अधिकृत घोषणा केली होती. त्या फोटोत विकी कौशल कतरिनाच्या बेबी बंपकडे प्रेमाने पाहताना दिसत होता, तर दोघेही पांढऱ्या कपड्यांमध्ये त्यांच्या मुंबईतील घरात पोज देत होते. सध्या ती घरी विश्रांती घेत असून, तिची आई आणि बहिणे तिच्या सोबत आहेत. काही अहवालांनुसार, कतरिना तिच्या प्रसूतीसाठी परदेशात जाण्याचा विचार करत आहे, मात्र या बाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा रिसॉर्टमध्ये सात फेरे घेतले होते. या लग्नाला नेहा धुपिया–अंगद बेदी, कबीर खान–मिनी माथुर, शर्वरी वाघ, मालविका मोहनन आणि इतर जवळचे मित्र उपस्थित होते. त्यांच्या लग्नाच्या गोपनीयतेमुळे तेव्हाही दोघं प्रचंड चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा गोपनीयतेचा मुद्दा पुढे आला आहे मात्र यावेळी प्रसंग अधिक गंभीर असल्याचं मानलं जात आहे.

सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यावर डोकावणं आणि त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ लीक करणं, ही समस्या नविन नाही. पण एखादी महिला गरोदर असताना तिच्या वैयक्तिक क्षणांचा भंग करणे, हे अधिक गंभीर मानले जात आहे. सध्या सोशल मीडियावर ‘मीडिया एथिक्स’ आणि ‘सेलिब्रिटी प्रायव्हसी’ यावर मोठी चर्चा सुरू आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी अद्याप या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र चाहत्यांकडून मिळणारा पाठिंबा आणि इंडस्ट्रीतील कलाकारांचा विरोध पाहता, या प्रकरणावर लवकरच काही ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

काँग्रेस पक्षाला भगदाड! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक

आता महिलेला पाहून ‘शिट्टी’ वाजवण्यापूर्वी विचार करा! कोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निकाल