कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

मानवी वस्तीच्या आसपास वावरणाऱ्या व्याघ्र कुळातील बिबट्याने माणसावर हल्ले सुरू केल्यानंतर परिस्थिती गंभीर बनली आहे. आता या भरमसाठ संख्येने वाढलेल्या बिबट्यांचे करायचं काय? या प्रश्नाने सर्वसामान्य माणूसच नाही तर शासन सुद्धा हैरान झाले आहे. आता या बिबट्यांची (Leopard)संख्या कमी करण्यासाठी त्यांची रवानगी वनतारा किंवा तत्सम निवारा केंद्रामध्ये करण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे. मात्र अशी परिस्थिती काय निर्माण झाली याचा अंतर्मुख होऊन विचार केला गेला तर बिबट्यांचे हे संकट मानवनिर्मित असल्याचे लक्षात येईल.गेल्या काही वर्षांपासून व्याघ्र कुळातील बिबट्याची संख्या वाढू लागली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात किमान दोन ते अडीच हजार बिबटे असावेत असा वनविभागाचा अंदाज आहे.

सध्या शिरूर ,मंचर ,जुन्नर या परिसरात बिबट्याने धुडकूस घातला आहे. आता तर त्याची मजल माणसावर हल्ले करण्यापर्यंत पोहोचली आहे.आणि म्हणूनच जिथे जिथे बिबट्याचा वावर आहे त्या त्या भागात कमालीचे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बिबट्या(Leopard) मादींची संख्या 400 च्या आसपास आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. यावर आत्ताच परिणामकारक उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर कुत्री कमी आणि बिबट्या जास्त अशी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.व्याघ्र कुळातील पट्टेरी वाघ असो,ब्लॅक पॅंथर असोकिंवा बिबट्या असो यांचा अधिवास हा जंगलात असतो आणि आहे. पण त्यांच्या अधिवासात त्यांना अन्न म्हणून मिळणारे तृणभक्षी प्राणी झपाट्याने कमी होऊ लागले आहेत. हरीण, चितळ,सांबर, ससा, साळींदर, भेकर रान डुक्कर हे बिबट्यांचे अन्न आहे.

पण या तृणभक्षी प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे बिबट्यांची अन्नसाखळी तुटली आहे.जंगलातील अन्न दुरापास्त झाल्यानंतर अन्नाच्या शोधात हे बिबटे लोकवस्तीच्या आसपास वावरू लागले. अन्नासाठी भ्रमंती करणाऱ्या बिबट्यांचे वस्तीस्थान हे उसाचे मळे बनू लागले. पश्चिम महाराष्ट्रात ऊस मोठ्या प्रमाणावर असतो आणि आहे. या उसातच बिबट्यांचा अधिवास सुरू झाला इतकेच नव्हे तर बिबट्या मादीची प्रसूती उसाच्या फडातच होऊ लागली. परिणामी बिबट्यांना जंगलाचा विसर पडला आणि त्यांचा मुक्काम उसाच्या फंडातच होऊ लागला. कदाचित त्यांच्यातील जनुकीय गुणसूत्रे (डी एन ए)बदलली असावीत. उसाच्या फडात असलेल्या बिबट्यांना त्याच्या मूळ अधिवासात म्हणजे जंगलात जाऊ देण्यात वनविभाग कमी पडू लागला आहे असे दिसते.

सध्या शिरूर भागामध्ये एका नव्या भक्षक बिबट्याचा वावर आहे आणि त्यामुळे तेथील सर्वसामान्य जनतेत कमालीची घबराट पसरली आहे. बिबट्याची दहशत शासन दरबारी पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे गांभीर्याने दखल घेतलेली दिसते. पश्चिम महाराष्ट्रातील बिबट्यांची रवानगी वनतारा किंवा तत्सम रेस्क्यू सेंटर मध्ये केली जाईल. त्यासाठी केंद्रीय वन मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. केंद्र शासनाकडून रीतसर मंजुरी मिळाल्यानंतर ऑपरेशन बिबट्या हे अभियान राबविले जाणार आहे. बिबट्यांना पकडून त्यांची रवानगी रेस्क्यू सेंटरमध्ये करणे हे सहज आणि सोपे काम नाही. त्याला अनेक दिवस लागतील.बिबट्यांनी जंगलातील त्यांच्या अधिवासात जावे असे वातावरण तयार केले पाहिजे. जंगलातील तृणभक्षी प्राण्यांचीसंख्यावाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्यासाठी गवती कुरणे तयार केले पाहिजेत. तृणभक्षी प्राण्यांसाठी खास प्रकारचे ग्रास लागते.

त्याला आवश्यक असलेले अन्न त्याच्या अधिवासातच उपलब्ध झाले तर वन्यप्राणी लोकवस्तीकडे फिरकणार नाहीत.लोकवस्तीच्या आसपास फिरकणाऱ्या बिबट्यांना कुत्री, कोंबड्या, वासरू शेळ्या आणि मेंढ्या असे अन्न सहज उपलब्ध होत असल्यामुळे बिबट्याचे संकट अधिक गडद झाले आहे.सहज मिळणाऱ्या अन्नाची रसद तोडण्याची जबाबदारी माणसावरच आहे. तसे झाले तर हा बिबट्या जंगलात माघारी जाऊ शकतो. पण हे संकट कोणी निर्माण केले असा प्रश्न स्वतःलाच विचारला तर त्याचे उत्तर मिळू शकते.माझे अन्न कुणीतरी पळवत असतील तर मी तुमच्या ताटातील अन्न शिल्लक ठेवणार नाही. तुमच्या दारापर्यंत येऊन, घरात घुसून मी माझे अन्न मिळवेन असा हा साधा सिद्धांत आहे.

आणि बिबट्या तसेच वागताना दिसतो आहे. बिबट्यांची संख्या कमी करावयाची असेल तर बिबट्या मादींचे निर्बीजीकरणकेले गेले पाहिजे. ही उपाययोजना दीर्घकाळ चालणारी आहे. ती सहज आणि सोपी नाही.बिबट्यांच्या डी एन ए मध्ये बदल झाला आहे असे मानता येईल अशी परिस्थिती आहे. आणि तसे असेल तर या बिबट्यांना त्यांच्या अधिवासात माघारी घालवणे हे एक मोठे आव्हान असणार आहे. सध्या तरी जे बिबटे नरभक्षक झालेले आहेत त्यांना गोळ्या घालण्याचा निर्णय वनविभागाला घ्यावा लागेल.

हेही वाचा :

‘क्रिकेटचा राजा’ आणि ‘चेस मास्टर’ विराट कोहली झाला ३७ वर्षांचा
विमानाचा भीषण अपघात ; उड्डाण घेताच विमान कोसळले अन्…, VIDEO व्हायरल
दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची जोरदार धडक; पत्नीसमोरच पतीला ट्रकने चिरडले