हिवाळा सुरू होताच तापमानात घट जाणवू लागते आणि त्यासोबतच सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि थकवा यांसारख्या आरोग्य समस्या वाढू लागतात. अशा वेळी नैसर्गिक औषध म्हणून मधाचा (honey)वापर आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतो. आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, दररोज सकाळी रिकाम्या पोटी फक्त एक चमचा मध घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि विविध संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते.

मधामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे सर्दी-खोकल्यासारख्या हिवाळ्यातील आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून कार्य करतात. विशेषतः घशातील खवखव, खोकला आणि जळजळ कमी करण्यासाठी मध प्रभावी मानला जातो. झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून घेतल्यास खोकला कमी होतो आणि झोपही चांगली लागते.

हृदयाच्या आरोग्यासाठीही मध अत्यंत फायदेशीर आहे. त्यातील नैसर्गिक साखर आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात आणि धमन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. दररोज मध(honey) आणि कोमट पाणी घेतल्याने रक्ताभिसरण सुधारते व हृदयरोगाचा धोका कमी होतो.पचनसंस्थेसाठीही मध उपयुक्त आहे. हे पोटातील हानिकारक जंतू नष्ट करते आणि अन्न पचनास मदत करते. बद्धकोष्ठता, पोट फुगणे किंवा जडपणा जाणवत असल्यास मधाचे सेवन विशेष लाभदायक ठरते.

थंड वातावरणामुळे शरीरात आळस आणि थकवा जाणवतो, परंतु सकाळी एक चमचा मध घेतल्याने ताजेपणा आणि उर्जा मिळते. त्यामुळे हिवाळ्यात दररोजच्या आहारात मधाचा समावेश केल्यास अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकते.तथापि, तज्ज्ञांच्या मते, मध १ वर्षाखालील मुलांना देऊ नये, कारण त्यात बोटुलिझम बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते. तसेच मधुमेहींनी मधाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे आणि ज्या व्यक्तींना मधाची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी त्याचे सेवन टाळावे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतलेला मध हा हिवाळ्यातील सर्वोत्तम नैसर्गिक आरोग्यरक्षक ठरतो.

हेही वाचा :

‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही…
 सोन्या – चांदीच्या भावात मोठा बदल….
2026 च्या T20 विश्वचषक उपांत्य फेरीसाठी दोन ठिकाणांची निवड…