इचलकरंजी : महावितरण (electric)कंपनीच्या उघड्या हाय व्होल्टेज डीपीजवळ विजेचा जबर धक्का बसून चिमुरडी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीतील मुथरा हायस्कूल रिंग रोड, दातारमळा परिसरात घडली आहे. राधिका रमेश चव्हाण (वय ५, रा. अब्दूल लाट, ता. शिरोळ) असे या चिमुरडीचे नाव आहे. विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की तिच्या हात-पायांवर भाजल्याच्या खोल जखमा झाल्या आहेत.

राधिका सुट्टीसाठी इचलकरंजी येथे मामाकडे आली होती. खेळताना ती परिसरातील उघड्या हाय व्होल्टेज डीपीच्या अगदी जवळ गेली होती. काही क्षणांतच तिला जोरदार विजेचा(electric) धक्का बसला. या भीषण घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन राधिकाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे. राधिकाचे कुटुंब गरीब असून, वडील रमेश चव्हाण मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी महावितरणकडून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

महावितरणच्या गलथान व निष्काळजी कारभारामुळे एका गरीब मजुराच्या घरातील निष्पाप मुलगी आज आयुष्य आणि मृत्यूच्या सीमेवर आहे, हे शहरासाठी कलंकासमान असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. शहरातील इतर भागांतही उघड्या डीपी, कुंपणाचा अभाव आणि चेतावणी फलक नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जखमी राधिकाच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत, योग्य नुकसान भरपाई आणि तिच्या उपचारांचा पूर्ण खर्च महावितरणकडून उचलला नाही, तर आम्ही आंदोलन करू असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

या परिसरातील हाय व्होल्टेज डीपी बराच काळ उघडाच होता. झाकण गंजलेले, तारांची स्थिती निकृष्ट, आणि परिसरात कोणतेही सुरक्षा कुंपण नव्हते. अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. परिणामी हा गंभीर अपघात घडला. घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा संताप उसळला. महावितरणचे अधिकारी तब्बल दोन-अडीच तासांनी घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

हेही वाचा :

सफारीदरम्यान गाडीतून सेल्फी घेत होती महिला; तेवढ्यात सिंहाने हात जबड्यात धरला अन्… भयावह Video Viral
अनायाची नवी इनिंग; क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक…
‘या’ मराठी अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र