सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता या फसवणुकीच्या जाळ्यात एका महिला वकिलाला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, या फसवणुकीसाठी फसवणूक (Online scam)करणाऱ्यांनी प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्कर यांच्या नावाचा गैरवापर केला आहे. वरळीतील बीडीडी चाळीत राहणाऱ्या वकिलेला या ऑनलाईन गुन्ह्यात तब्बल पाच लाख रुपयांचा गंडा बसला आहे. या घटनेची तक्रार पीडित शबनम मोहम्मद हुसेन सय्यद यांनी वरळी पोलिस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी आयटी कायदा आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू केला आहे.

शबनम सय्यद या जून 2025 मध्ये इंटरनेटवर काही लेख आणि व्हिडिओ पाहत होत्या. त्यावेळी त्यांना FXOnet नावाच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा प्रचार करणारे व्हिडिओ दिसले. या व्हिडिओंमध्ये गायिका नेहा कक्कर FXOnetची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्या व्हिडिओंमध्ये FXOnet हा “विश्वसनीय आणि कायदेशीर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म” असल्याचंही सांगण्यात आलं होतं. नेहा कक्करसारख्या लोकप्रिय कलाकाराचं नाव पाहून शबनम सय्यद यांना प्लॅटफॉर्मवर विश्वास वाटला. त्यांनी FXOnetशी संपर्क साधला आणि त्याद्वारे काम करणाऱ्या विजय आणि जिमी डिसूझा या दोन व्यक्तींशी बोलणी केली. त्यानंतर त्यांना ट्रेडिंग अकाउंट उघडण्याचं आणि गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं गेलं.

फसवणूक करणाऱ्यांनी दररोज “एक्स्पर्ट इन्व्हेस्टमेंट टीप्स” देण्याचंही आश्वासन दिलं. त्यावर विश्वास ठेवून शबनम सय्यद यांनी 18 जून ते 9 ऑक्टोबर 2025 या काळात ₹5.02 लाख रुपये गुंतवले. त्यांनी पैसे राजेश कन्नन, VPI ProMedia Kigali, India Impex Trading Company आणि VPI 361 VPECOM अशा विविध नावांच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. काही काळानंतर गुंतवणुकीवर कुठलाही परतावा न मिळाल्याने आणि खाते बंद झाल्याचं लक्षात आल्यानंतर शबनम सय्यद यांना आपली फसवणूक झाल्याचं उमगलं. त्यानंतर त्यांनी वरळी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रं वेगानं फिरवली आहेत. टेलिग्राम चॅट्स, झूम रेकॉर्डिंग्ज आणि बँक व्यवहारांचे तपशील तपासले जात आहेत. फसवणुकीत(Online scam) सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, नेहा कक्कर यांचा या प्रकरणाशी काहीही थेट संबंध नाही, मात्र त्यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक केली गेली आहे. सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, ‘सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीच्या जाहिरातींवर त्वरित विश्वास ठेवू नका. सेलिब्रिटींच्या नावाने पसरवल्या जाणाऱ्या प्रमोशनल व्हिडिओंची खात्री करूनच व्यवहार करा.’

हेही वाचा :

गुंतवणूकदार मालामाल होणार, ही कंपनी एकावर 1 शेअर फ्री देणार
ट्रकची धडक बसल्यावर तरुणीसोबत जे घडलं पाहून तुम्हीही व्हाल चकित, Video Viral
मोबाईलचा बॅलन्स झीरो ? तरीही करता येईल कॉल..