इचलकरंजी, पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्रनिर्मितीचे(textile) सर्वात मोठे केंद्र, पुन्हा एकदा जागृत होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बिहार विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर मतदार म्हणून गावी परत गेलेले परप्रांतीय कामगार आता मोठ्या प्रमाणात परत येऊ लागले आहेत, आणि यामुळे इचलकरंजीसह परिसरातील वस्त्रोद्योगांना नवी ऊर्जा मिळाली आहे.

इचलकरंजी ‘वस्त्रनगरी’ म्हणून देशभर ओळखले जाते. येथे पॉवरलूम, सूत गिरण्या, प्रोसेसिंग, डाईंग, वॉरपिंग, स्टिचिंग, ट्रान्सपोर्ट असे विविध पूरक उद्योग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. या उद्योगांचा कणा म्हणजे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, बंगाल, ओडिशा इथून येणारे कुशल परप्रांतीय कामगार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात या कामगारांपैकी मोठ्या संख्येने लोक मतदानासाठी त्यांच्या गावाकडे गेले होते. त्याचा थेट परिणाम उद्योग क्षेत्रावर झाला. वस्त्रउद्योगातील अनेक यंत्रमाग बंद पडले, उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटले, ऑर्डर्स पूर्ण करण्यात अडचणी आल्या, आणि व्यापार व्यवहार मंदावले.
मात्र आता परिस्थितीत सकारात्मक बदल झाला आहे. बिहार निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच परप्रांतीय मजूर पुन्हा इचलकरंजीकडे येऊ लागले आहेत. रेल्वे आणि बसस्थानकांवर परतीच्या कामगारांची गर्दी वाढलेली दिसत आहे. उद्योग संघटनांच्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. परिणामी बंद असलेली यंत्रे पुन्हा सुरू होतील, दोन्ही शिफ्टमध्ये कामकाज सुरू होईल, आणि कापड उत्पादनात पुन्हा वाढ होईल. यामुळे निर्यातीतही उभारी येण्याची शक्यता आहे. यातून सूत, रंगाई, प्रक्रिया, वाहतूक आणि व्यापार अशा पूरक व्यवसायांनाही अधिक वेग मिळणार आहे.
दिवाळीनंतर कापड बाजारात निर्माण झालेल्या मागणीची पूर्तता करण्यात आलेला अडथळा आता कमी होईल. साड्या, शर्टिंग, गबर्दीन, सूटिंग, धोतर, आणि विविध प्रकारच्या कापड विभागांमध्ये पुन्हा हालचाल सुरू झाली आहे. कारखानदारांनीही दिलासा व्यक्त करत “कामगार परत येत आहेत, त्यामुळे उद्योगाचा वेग पुन्हा वाढेल,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.सध्या इचलकरंजीत ‘कामगार परत – उद्योग परत’ असे चित्र उमटू लागले आहे. कामगारांच्या परतीने वस्त्रनगरीत (textile)चैतन्य परत आले आहे आणि उद्योगधंद्यांना नव्या उत्साहाने गती मिळू लागली आहे.

हेही वाचा :
पुन्हा एकदा देशावर मोठं संकट! 18 ते 20 नोव्हेंबरला मोठा इशारा
तुम्हीही रात्री कणिक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का? आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो?
‘या’ Helmet ची जोरदार चर्चा! बुलेट प्रूफ जॅकेटसारखी सुरक्षा आणि किंमत फक्त…