नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अवघ्या 48 तासांपूर्वी आयपीएल इतिहासातील आपली सर्वोच्च 264 धावसंख्या उभारणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर पूर्णपणे दैना उडाली. (crushed) गतविजेत्या आरसीबीने दिल्लीला 16.3 षटकांत केवळ 75 धावांवर गुंडाळत 9 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.

टॉस जिंकून आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे योग्य ठरला. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी सुरुवातीपासूनच दिल्लीच्या फलंदाजीचा कणा मोडला. दिल्लीचे पहिले सहा फलंदाज अवघ्या 25 चेंडूत माघारी परतले. साहील पारख, समीर रिझवी आणि कर्णधार अक्षर पटेल यांना खातेही उघडता आले नाही. केएल राहुल आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी 1 धाव केली, तर कुलदीप यादव 3 धावांवर बाद झाला.
दिल्लीकडून अभिषेक पोरेलने सर्वाधिक 30 धावांची झुंज दिली. डेव्हिड मिलरने 19 धावा तर कायले जेमिसनने 12 धावांचे योगदान दिले. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरल्याने संपूर्ण संघ 75 धावांत आटोपला. आरसीबीकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमारने 3 बळी मिळवत दिल्लीच्या वरच्या फळीचा धुव्वा उडवला. रसीख सलाम डार, सुयश शर्मा आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत प्रभावी साथ दिली.
76 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. जेकब बेथल आणि विराट कोहली यांनी पहिल्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी केली. जेकब 20 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी नाबाद भागीदारी करत सामना संपवला.
विराटने नाबाद 23 धावा केल्या, तर देवदत्त पडिक्कलने 34 धावांची झंझावाती खेळी साकारली. आरसीबीने 6.3 षटकांत लक्ष्य गाठत 81 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने हंगामातील सहावा विजय नोंदवला, तर दिल्लीला घरच्या मैदानावर तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला. दोन दिवसांत 264 धावांवरून 75 धावांपर्यंत घसरलेल्या दिल्लीच्या कामगिरीने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.
हेही वाचा
अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व
सावध ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण
धावत्या लोकलमध्ये खुनी खेळ, धारदार चाकूने प्रवाशांमध्ये मोठी घबराट नेमकं काय घडलं?