कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून पुन्हा एकदा वातावरण तापले असून भाजप आमदार शिवाजी पाटील आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (politics) यांच्यात जोरदार शब्दयुद्ध रंगले आहे. गोकुळच्या आगामी सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर थेट आरोप-प्रत्यारोप केल्याने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

आमदार शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, गोकुळमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांना सोडून इतर कोणीही चालतील, असा टोला लगावला. गोकुळमधील काही ज्येष्ठ संचालकांसह अनेकांची ईडी चौकशी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. नविद मुश्रीफ यांच्यावरही निशाणा साधत, कारभारातील सर्व एबीसीडी शिकूनच ते येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो, मात्र तेथेही कुरघोड्या झाल्या. त्यामुळे गोकुळचा लढा आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे निर्णय घेतील, तेच अंतिम असतील, असे सांगत त्यांनी तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे नमूद केले.
दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी रात्री उशिरा आमदार पाटील यांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. शिवाजी पाटील यांचे पूर्वायुष्य काय आहे आणि त्यांनी आयुष्यातील जास्तीत जास्त दिवस कुठे घालवले, हे सर्वांना माहिती असल्याचे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला. त्यांचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठीच हे शेवटचे उत्तर देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुश्रीफ यांनी पुढे दावा केला की, जिल्हा परिषद निवडणुकीतील एका सभेमुळे पाटील यांच्या आठ जागा पडल्या होत्या, त्याचे दुःख त्यांना आजही आहे. मात्र, ते जाणीवपूर्वक माझी आणि माझ्या मुलाची बदनामी करत आहेत. त्यामुळे आमचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत, असेही त्यांनी म्हटले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेले हे आरोप-प्रत्यारोप आता आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची मानली जाते आणि यंदाही ती रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हेही वाचा
उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट
कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा