आधार कार्ड(Aadhaar card) हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे. शाळेत प्रवेश घेण्यापासून बँक खातं उघडण्यापर्यंत आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक असतं. इतकंच नव्हे तर केवायसी पासून मोबाईल सिमकार्ड मिळवण्यापर्यंत सर्वत्र आधारकार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे हे कागदपत्र पूर्णपणे अपडेट असणं तितकंच गरजेचं आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो पालकांना आणि मुलांना थेट फायदा होणार आहे.केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार, आता लहान मुलांच्या आधार कार्डाच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आतापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पन्नास रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र आता पालकांना हा आर्थिक बोजा सहन करावा लागणार नाही.
विशेष म्हणजे 5 ते 7 वर्षे वयोगटातील मुलांचे तसेच 15 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार अपडेट आता पूर्णपणे विनाशुल्क करण्यात येणार आहे. यामुळे लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होणार आहे आणि मुलांच्या नोंदणी प्रक्रियेला गती मिळणार आहे. सरकारने आता लहान मुलांच्या आधार कार्डाचे(Aadhaar card) बायोमेट्रिक अपडेट करणे सक्तीचे केले आहे. यामुळे भविष्यातील शैक्षणिक, आर्थिक आणि शासकीय प्रक्रियेत मुलांना अडथळे येणार नाहीत. या नव्या नियमांमुळे देशभरातील पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेसारख्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक असते. त्यामुळे ते अपडेट असणं अत्यावश्यक आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शासकीय योजना मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे व्यवस्थित ठेवणं पालकांसाठी आता अधिक सुलभ होणार आहे.
हेही वाचा :
मराठा आरक्षण ‘जीआर’ विरोधातील याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार
शिवसेना-मनसे युतीत जागा वाटप फॉर्म्युला ठरला, कोण किती जागा लढणार ?
सचिन तेंडुलकरबरोबरच्या अफेरबद्दल मराठी अभिनेत्रीचा गौप्यस्फोट…