महाराष्ट्रातील ट्रकचालक (driver)आणि व्यावसायिक वाहनचालकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने अवजड मोटार वाहनांमध्ये क्लीनर उपस्थित असल्यास लावला जाणारा ₹1500 चा दंड रद्द करण्याची अधिसूचना जारी केली आहे.या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून अन्यायकारक दंडाचा सामना करणाऱ्या ट्रकचालकांना आणि ट्रान्सपोर्टर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा, बैठका आणि प्रशासनाशी संवाद साधल्यानंतर अखेर हा निर्णय झाला.

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे माजी अध्यक्ष बल मलकीत सिंह यांनी सांगितले की, “ही फक्त अधिसूचना नाही तर हा प्रत्येक ट्रकचालक(driver), ट्रान्सपोर्टर आणि कार्यकर्त्यांचा विजय आहे. आमच्या एकजुटीच्या प्रयत्नांनी आणि संघर्षामुळे कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे तसेच चालकवर्गाला अनावश्यक त्रास आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळणार आहे.”या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (गृह) इकबाल सिंग चहल आणि परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

कायदेशीर प्रक्रियांमुळे ही फाईल दीर्घकाळ कायदा व न्याय विभाग तसेच गृह विभागात फिरत होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात सर्व विभागांच्या सहकार्यामुळे हा निर्णय होऊ शकला.हा निर्णय ट्रान्सपोर्ट क्षेत्रासाठी सकारात्मक बदल घडवणारा टप्पा ठरेल. संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून दीर्घकालीन प्रश्न सोडवता येतात, हे या निर्णयातून सिद्ध झाल्याचे बल मलकीत सिंह यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार?
अ‍ॅपल यूजर्ससाठी खुशखबर! iPhone 16 Plus वर आकर्षक ऑफर उपलब्ध
 पुढच्या सीझनमध्ये नव्या नावासह मैदानात उतरणार नीता अंबानींची टीम