लाडक्या बहि‍णींसाठी आदिती तटकरेंचे खास ट्वीट, ईकेवायसीवर म्हणाल्या…

राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली फसवणूक आणि गैरप्रकार घडत असल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनही सतर्क झाले आहे.

जळगावमधील एका ३५ वर्षीय महिलेला ई-केवायसी (EKYC) करून देण्याच्या (malpractices) बहाण्याने आरोपीने थेट शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवून देतो, असे आमिष दाखवत आरोपी गोकुळ चव्हाण हा महिलेच्या घरी गेला. कागदपत्रांची पूर्तता आणि केवायसी प्रक्रिया करून देतो, असे सांगून त्याने विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर त्याने सरकारी मदतीच्या नावाखाली महिलेकडे अश्लील मागणी केली.

या घटनेनंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, महिलेच्या पतीने आरोपीला समज दिल्यानंतरही तो परिसरात फिरत राहिला आणि महिलेचा पाठलाग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी गोकुळ चव्हाण याला अटक केली असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महिलांना कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन करत स्पष्ट केले की, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सध्या नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू नाही. केवळ आधीच्या अर्जांमध्ये ई-केवायसीमध्ये त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

तसेच, ई-केवायसीसाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नसून महिला स्वतः मोबाईलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

हे ही वाचा;

एसटी प्रवास महागणार, हंगामी वाढ १५ एप्रिलपासून; किती रुपयांनी वाढले आकडेवारी आली

सहलीला गेली अन् घात झाला, 15 वर्षांच्या मुलीचा दरीत सापडला मृतदेह, पालकांनो ‘या’ 5 चुका टाळा

८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, कोणत्या फॉर्म्युलानुसार पगार किती रुपायांनी वाढणार?