कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही. (Constitution)मराठ्यांना कुणबी ठरवण्याचा अधिकार केंद्रीय मागास आयोगाला आहे. अशा आशयाचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केल्यामुळे, आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांनीही हैदराबाद गॅझेटचा आधार का घेतला जातो असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या लढ्यातून मिळवलेले आरक्षण फसलेले तर नाही ना? असा नवीनच प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.हैदराबाद, सातारा, औंध, कोल्हापूर गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी ठरवण्याचा आणि योग्य ती पडताळणी करून तसा दाखला देण्याचा जीआरमहाराष्ट्र शासनाने दीड दोन महिन्यापूर्वी काढला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री गटाच्या उपसमितीने आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुफळ चर्चा केल्यानंतर सकल मराठा समाजाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले. आपणाला आता आरक्षण मिळालेले आहे आणि ते आता कोणीही रोखू शकत नाही‌ अशा शब्दात मराठा समाजास त्यांनी आश्वस्त केले होते.

शासनाचा जीआर निघाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात काही तांत्रिक अडचणी येऊ लागल्यानंतर
जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसंगी आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे.
अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हजारो मराठ्यांसह मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले. (Constitution)एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांच्या समोर येऊन मराठ्यांना आरक्षण दिलं असल्याचं जाहीर केलं होतं.प्रत्यक्षात ते मिळालंच नाही.आता दिड दोन महिन्यापूर्वीहजारो कार्यकर्त्यांसह मुंबईत आझाद मैदानावर येऊन आमरण उपोषण करणाऱ्या मनोज रंगे पाटील यांना मंत्री गटाच्या उपसमितीने आश्वासन दिले आणि जीआर सुद्धा काढला. आता त्यातही कुणबी दाखला देण्यात तांत्रिक अडचणी येऊ लागल्यामुळे मुंबईतील आंदोलन फसलं की काय अशी शंका सर्वसामान्य मराठा जनतेला येऊ लागली आहे.


कोल्हापुरात खंडे नवमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शस्त्र पूजन कार्यक्रमात श्रीमंत शाहू छत्रपती आणि निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी मराठा आरक्षण संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल साशंकता व्यक्त केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दुसऱ्यांदा फसले आहे असे म्हणावे लागेल.श्रीमंत शाहू छत्रपती यांनी भारतीय संविधान, कोल्हापूर गॅझेट, 1902 सारी राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाचा काढलेला आदेश आणि लेखणी यांची शस्त्रे समजून पूजा करून मराठा आरक्षणाच्या आणखी एका लढ्याची जाहीरपणे घोषणास करून टाकली. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा मोठा लढा उभा करूनही त्यांच्या हाती प्रत्यक्षात काहीच लागलेले नाही. (Constitution)शासनाकडून त्यांची फसगत झालेली आहे. त्यामुळे आता पुन्हा आरक्षणाचा लढा सुरू करावा लागेल असे श्रीमंत शाहू छत्रपती यांनी म्हटले आहे. हैदराबाद गॅझेटला त्यांचा विरोध आहे. जान निजामाचा मराठ्यांनी तीन वेळा पराभव केला त्या निजामाच्या गॅझेटचा मराठा आरक्षणासाठी आधार कशासाठी घेतला जातो आणि कशासाठी घ्यायचा असा त्यांचा सवाल आहे.

त्यांनी हा प्रश्न मराठ्यांच्या स्वाभिमानाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केलेला दिसतो. पराभूतांचा इतिहास स्वीकारायचा नसतो असे म्हणता येणार नाही. त्याच्या कारकिर्दीत झालेल्या गॅझेटचा मराठ्यांना त्यांच्या उन्नतीसाठी उपयोग होत असेल तर तो का घेतला जाऊ नये? राजर्षी शाहू महाराज यांनी सुद्धा इतर मागासांना आरक्षण देताना मराठा समाज हा मागास असल्याचे म्हटले आहे. म्हणूनच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी पुन्हा एक नवा लढा उभारण्याची गरज या कार्यक्रमात बोलताना अनेकांनी व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलावडे यांनी केंद्रीय मागास आयोगाने मराठ्यांना मागासव ठरवले तरच त्यांना कुणबी म्हणून मान्यता मिळेल. (Constitution)राज्य शासनाला तसा कोणताच अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे आणि ते स्वतः न्याय संस्थेचा एक भाग असल्यामुळे त्यांचे म्हणणे दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही.

पण जेव्हा आझाद मैदानावर मंत्री गटाची उपस्थिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा सुरू असताना आणि चर्चेचे फलित निष्पन्न होत असताना श्रीमंत शाहू छत्रपती तसेच निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलावडे यांनी आपली आत्ताची मते तेव्हा मांडायला हवी होती. बहुजन समाजाला बरोबर घेऊन मराठ्यांनी आरक्षणाची लढाई लढली पाहिजे असे ते म्हणतात. पण बहुजन समाज म्हणजे कोणता हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. बहुजनातील ओबीसी समाज असे त्यांना म्हणायचे असेल किंवा त्यांनी गृहीत धरले असेल तर मग ओबीसी समाजाचा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध आहे. (Constitution)हा मुद्दा बाजूला करता येणार नाही.एकूणच कोल्हापुरात खंडे नवमीच्या निमित्ताने शस्त्र पूजन करताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईसाठी कोणती हत्यारे असतील हे स्पष्ट करण्यात आले आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्याशिवाय एका नव्या लढाईची सुरुवात कोल्हापुरातून होईल आणि त्याचे नेतृत्व विद्यमान खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याकडे असेल हेही स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा :

आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .

राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…