कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: कोणत्याही समूहाबद्दल ममत्वाची किंवा द्वेषमूलक भूमिका घेणार नाही,अशा आशयाची शपथ मंत्रीपद ग्रहण करताना घ्यावी लागते.या शपथेचा भंग करायचा नाही असे संकेत आहेत आणि ते संबंधितांनी काटेकोरपणे पाळले पाहिजेत अशी सर्वांचीच अपेक्षा असते.छगन भुजबळ मात्र अशा प्रकारचे संकेत पाळताना दिसत नाहीत. इतकेच नाही तर ते सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध बोलत असतात. आता याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते अजित दादा पवार यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांची कान उघाडणी केलेली आहे.पक्षाच्या व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना अजित दादा पवार यांनी”काही नेते जातीय भूमिका घेतात. एकाच जातीची पाठ राखण करत असतात. त्यांची ही कृती पक्षाला अडचणीत आणते”.अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली(group).

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण संदर्भात वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेबद्दल अजित दादा पवार यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना फटकारले आहे.अजितदादा यांच्याकडून हे आधीच व्हायला हवे होते.कोणत्याही राजकीय पक्षाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत च्या निवडणुकीत सर्वच जाती-जमाती आणि धर्मीयांची मते हवी असतात.कारण पक्षाचे भवितव्य अशा मतांवर अवलंबून असते. अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच घटकांची मते हवी आहेत. तथापि राष्ट्रवादी काँग्रेस मधील जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मात्र जात संघर्ष पेरला जातो. मराठा विरुद्ध ओबीसी असे त्यांनी चित्र समोर आणले आहे. त्यांच्या या जातीय भूमिकेमुळे समाजातील एक मोठा घटक, पक्षापासून दूर जाऊ शकतो. त्यामुळे नुकसान आपल्याच पक्षाचे होणार आहे. हे लक्षात आणून देण्यासाठी अजित दादा पवार यांनी छगन भुजबळ यांना त्यांचे नाव न घेता फटकारले आहे.
अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि सर्वे सर्वा आहेत. त्यांना पक्ष वाढवायचा आहे. त्यासाठी जन समर्थन गरजेचे असते. कुठल्या एका जातीला बाजूला ठेवून पक्ष वाढवता येत नाही. मराठा समाजाबरोबरच ओबीसी मधील सर्व जातीचे पाठवळ असले पाहिजे. पण आपलाच एक सहकारी आपल्याच पक्षात राहून वेगळी जातीय भूमिका घेत असेल तर त्यांला स्पष्ट शब्दात सांगितलेच पाहिजे. जे शरद पवार यांना जमले नाही ते अजितदादा यांनी करून दाखवले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अविभाजित होता तेव्हा छगन भुजबळ हे कायम वेगळी जातीय भूमिका घेत असत. त्यासाठी त्यांनी समता परिषदेचा उपयोग पुरेपूर करून घेतला आहे. माझ्या मागे संपूर्ण ओबीसी समाज आहे असे एक चित्र त्यांनी निर्माण केले होते आणि हा समाज आपल्या सोबत ठेवायचा असेल तर छगन भुजबळ यांना थोडी मोकळीक दिली पाहिजे अशी सावध भूमिका शरद पवार यांनी त्यांच्याविषयी घेतली होती(group).
सकल मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन हे मनोज जवंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून छगन भुजबळ हे मराठा विरोधी भूमिका घेताना दिसत होते.मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे ते थेटपणे सांगत होते.मी ओबीसी समाजाचा नेता आहे आणि माझे मंत्रीपद हे ओबीसी समाजाच्या विकासासाठी वापरणार असे ते जाहीरपणे सांगत होते. वास्तविक त्यांच्याकडून मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा वारंवार भंग केला जात होता.त्याबद्दल त्यांना कोणीही स्पष्ट शब्दात सांगत नव्हते. उलट ते ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर उपस्थित राहून मराठा समाजाला इशारे देत होते. त्यांची भाषा सभ्यतेची नव्हती.अजित दादा पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवल्यानंतर ते चांगलेच संतापले होते.

तेव्हा त्यांनी अजितदादा यांच्यावर चांगलीच आग पाखड केली होती. मला मंत्री पद नाकारणे म्हणजे ओबीसी समाजाची
नाराजी ओढवून घेतल्यासारखे आहे असे ते म्हणू लागले होते. मंत्रीपद असले काय किंवा नसले काय मला काय फरक पडत नाही पण ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी मला मंत्रिपद हवे आहे असा त्यांचा युक्तिवाद होता. धनंजय मुंडे यांना वाल्मीक कराड प्रकरण भोवले नसते तर ते महायुतीच्या मंत्रिमंडळात राहिले असते परिणामी भुजबळ यांना दूर ठेवता आले असते. तथापि धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेणे अजित दादांना भाग पडले.
मंत्री म्हणून राजकीय पुनर्वसन झाल्यानंतर छगन भुजबळ हे ओबीसी समाजाच्या व्यासपीठावरून फारच जोरात बोलू लागले
होते. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाज आपल्यापासून दूर होईल हे लक्षात आल्यानंतर अजितदादा यांनी छगन भुजबळ यांना त्यांचे नाव न घेता चांगलेच फटकारले आहे. विशेष म्हणजे छगन भुजबळ यांना साक्षी ठेवून दादांनी परखड शब्द वापरले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षात असलेल्या ओबीसी नेत्यांनी ओबीसी समाजाच्या हितासाठी पक्षीय अभिनीवेश बाजूला ठेवून बोलले पाहिजे असे आवाहन छगन भुजबळ यांनी नुकतेच केले होते आणि या पार्श्वभूमीवर अजितदादा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अप्रत्यक्ष कान उघाडनी केली आहे. तथापि छगन भुजबळ हे बोलायचे थांबतील असे त्यांच्या स्वभावावरून वाटत नाही.
हेही वाचा :
टीम इंडियासाठी गूड न्यूज, मॅचविनर खेळाडू दुखापतीनंतर परतण्यासाठी सज्ज..
‘Kantara Chapter 1’ ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
काही दिवसांनी मसाल्यांचा सुगंध निघून जातो? मग असे साठवा मसाले