‘लाडकी बहीण योजना बंद करा, पण दिलासा द्या’ इंधन दरवाढीनं पिचलेल्या सामान्यांची राज्य शासनाकडे मागणी

पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशातील महागाईचा दबाव अधिक तीव्र झाला असून, एप्रिल 2026 मध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर 8.3 टक्क्यांवर पोहोचल्याने आगामी काळातही नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचं चित्र आहे.

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ जाहीर केल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रातील वाहनचालकांमध्ये नाराजी वाढली आहे. ऑटो, टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर अवलंबून असल्याने या दरवाढीचा थेट परिणाम दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ झाल्याने सामान्य नागरिक, वाहनधारक आणि चालकवर्ग अधिकच अडचणीत सापडला आहे.

मुंबईत टॅक्सी आणि ओला-उबर चालकांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. वाढत्या इंधनदरांमुळे खर्च वाढत असताना प्रवासी भाड्यात वाढ होत नसल्याने व्यवसाय परवडत नसल्याची भावना चालकांनी व्यक्त केली. शहरातील रस्त्यांची खराब अवस्था आणि सर्वत्र सुरू असलेल्या खोदकामामुळे कमी अंतरासाठीही जास्त इंधन खर्च होत असल्याची तक्रार अनेक वाहनधारकांनी केली आहे.रायगड जिल्ह्यात या दरवाढीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. (Strait of Hormuz) काही नागरिकांनी आखाती देशांमधील संघर्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत सरकारला पूर्णपणे दोष देता येणार नाही असे मत व्यक्त केले. तर दुसरीकडे काही वाहनधारकांनी सरकारने इतर योजनांवरील खर्च कमी करून इंधनावरील कर कमी करावेत, अशी मागणी केली. जीएसटी कमी केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो, असेही अनेकांचे मत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. पेट्रोल आणि डिझेलसोबतच आता सीएनजीचाही तुटवडा जाणवू लागला आहे. शहरातील काही सीएनजी स्टेशनबाहेर शेकडो रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. (Strait of Hormuz) अनेक रिक्षाचालकांना गॅस भरण्यासाठी तीन ते चार तास प्रतीक्षा करावी लागत असून त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीवर परिणाम होत आहे. “काम करायचं की रांगेत उभं राहायचं?” असा संतप्त सवाल चालकांकडून उपस्थित केला जात आहे.शिर्डीमध्येही इंधन तुटवड्यामुळे वाहनधारकांची मोठी धावपळ सुरू आहे. ज्या पेट्रोल पंपांवर इंधनाचा टँकर पोहोचतो, त्या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. काही नागरिक अतिरिक्त इंधन साठवण्याचाही प्रयत्न करत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. अनेक पेट्रोल पंपांना पुरेसा पुरवठा मिळत नसल्यामुळे काही ठिकाणी पंप बंद ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे.

वाशिम जिल्ह्यातही 14 मेपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक पंपांवर ‘नो पेट्रोल’ आणि ‘नो डिझेल’चे फलक लावण्यात आले आहेत. (Strait of Hormuz) याचा फटका शेतकरी, मालवाहतूकदार आणि सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे. वाढत्या इंधनदरांमुळे भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरवाढ आणि इंधन तुटवडा या दुहेरी संकटामुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचा सुरळीत पुरवठा आणि दरांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी