सिद्धिविनायक मंदिरातील चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद, दर्शनाच्या बहाण्याने आला

डोंबिवलीतील एका प्रसिद्ध मंदिरात चोरीचा अत्यंत अजब प्रकार उघडकीस आला आहे. दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात आलेल्या एका चोरट्याने चक्क काठीला डिंक लावून दानपेटीतील पैसे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.(Siddhivinayak temple) मात्र, मंदिर प्रशासन आणि सतर्क भाविकांच्या प्रसंगावधानामुळे त्याचा हा डाव फसला असून त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही घटना डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरात शुक्रवारी सकाळी घडली. सकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी मंदिरात आला. सुरुवातीला त्याने शांतपणे दर्शन घेत असल्याचा आव आणला. (Siddhivinayak temple) त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या बारीक काठीच्या टोकाला डिंक लावून दानपेटीच्या फटीतून नोटा चिकटवून बाहेर काढण्यास सुरुवात केली.दानपेटीतून पैसे चोरण्याची ही वेगळी पद्धत पाहून उपस्थित भाविकांनाही धक्का बसला. आरोपीच्या हालचाली मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या. त्याचवेळी दर्शनासाठी आलेले पांडुरंग उडे आणि मंदिराचे खजिनदार चंद्रशेखर शिंदे यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ सतर्कता दाखवत आरोपीला पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने काठीच्या मदतीने दानपेटीतील काही रक्कम बाहेर काढण्यात यश मिळवले होते. मात्र पुढील चोरी करण्याआधीच त्याचा पर्दाफाश झाला. घटनेनंतर मानपाडा पोलिसांना बोलावण्यात आले आणि आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.सध्या मानपाडा पोलीस आरोपीची चौकशी करत असून, यापूर्वीही त्याने अशाच प्रकारे मंदिरांमध्ये चोरी केली आहे का याचा तपास सुरू आहे.(Siddhivinayak temple) दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी