कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : असे म्हटले जाते की, एक दरवाजा तुमच्यासाठी बंद झाला तर गडबडून जायचं नाही. मन चलबिचल होऊ द्यायचं नाही. कारण कोणता तरी दुसरा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातो आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरी कारभाराचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे(agreement). बसतो आहे. भरमसाठ, अवाजवी आयात शुल्क लावून अमेरिकेने भारताचा व्यापार व्यवहार थांबवला आहे. किंवा थांबवण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे.

भारताने “आत्मनिर्भर” तेचा भक्कम पर्याय ठेवून ट्रम्प महाशयांना तुमच्या निर्णयांचा आमच्यावर फार गंभीर परिणाम होणार नाही असा संदेश दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीच्या धोरणाचे प्रतिकूल पडसाद अमेरिकेतही सध्या उमटू लागले आहेत. शट डाऊन सारख्या प्रसंगाला ट्रम्प यांना सामोरे जाऊ लागले आहे. या एकूण पार्श्वभूमीवर भारत आणि ब्रिटन यांच्यात गुरुवारी विश्वास पूर्ण मैत्री कराराचा(agreement) शुभारंभ झाला. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन राष्ट्राप्रमुखांची भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत द्विपक्षीय संबंध, करार विषयक चर्चा झाली. नवी दिल्लीच्या बाहेर दोन राष्ट्र प्रमुखांची झालेली ही पहिली भेट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर नवी मुंबई येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी मुंबईच्या राजभवन येथील प्रशस्त हिरवळीवर मोदी व स्टार्मर यांची भेट झाली. भारताची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी, वेगवेगळ्या क्षेत्रासाठी करार मदार करण्यासाठी, भारताशी असलेल्या मैत्रीला नवा आयाम देण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर हे तब्बल दीडशे पेक्षा अधिक मंडळींचं व्यापक शिष्टमंडळ घेऊन गुरुवारी मुंबईत उतरले.
व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, हवामान बदल आणि शिक्षण या क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्याचा या दोन देशांनी निर्धार केला. या निर्णयामुळे भारत आणि ब्रिटनमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. ब्रिटनमधील एकूण नऊ विद्यापीठे भारतात शिक्षणाचा अध्याय सुरू करणार आहेत. त्यापैकी तीन विद्यापीठे मुंबईत असणार आहेत आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना होणार आहे.
दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार होणार असून त्यामुळे दोन्ही देशांची प्रगती होणार आहे. इसवी सन 2030 पर्यंत दोन्ही देशातील व्यापार दुप्पट होईल असे करार केले गेले आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार व इतर क्षेत्रात थोडेफार अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी मी आलो आहे असे स्पष्टीकरण पंतप्रधानांनी दिल्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक प्रकारचे विश्वास दर्शक वातावरण तयार झाले आहे. व्यापार करायला बरोबरच या दोन देशांमध्ये संरक्षण विषयक करारही(agreement) झाला आहे. या करारामुळे भारताला युके निर्मित अत्याधुनिक मार्टलेट क्षेपणास्त्रे उपलब्ध होणार आहेत. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय हवाई दल आणखी मजबूत होणार आहे.
ब्रिटनला भारत नवा नाही आणि भारतालाही ब्रिटन नवा नाही. दोन्ही देश एकमेकांना चांगले ओळखतात. आता या ओळखीला आणि मैत्रीला एक नवा आयाम मिळाला आहे. या नव्या मैत्री आयामाचा अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांना एक सुप्त संदेश पोहोचला आहे. आपल्याशिवाय किंवा आपल्या विना भारताचे काही बिघडत नाही असा हा संदेश आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायम सदस्यत्व मिळावे यासाठी भारत सातत्याने प्रयत्न करतो आहे. विशेषता नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून हे प्रयत्न अधिक तीव्रतेने केले जात आहेत. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनने सुरक्षा परिषदेत भारताला कायमचे सदस्यत्व मिळावे यासाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भारताच्या मागणीला बळ मिळाले आहे.
शैक्षणिक सामंजस्य करार झाल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. अति कुशल मनुष्यबळ तयार होण्यासाठी या कराराची मदत होणार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीला चित्रीकरणासाठी ब्रिटनने रेड कार्पेट अंथरले आहे. चित्रपट निर्मात्यांसाठी ब्रिटन सरकारने अनेक प्रकारच्या सवलती आता देऊ केलेल्या आहेत. त्यामुळे बॉलिवूड ला चित्रीकरणासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. पूर्वी तो होताच पण आता नव्या सवलती मिळणार आहेत. एकूणच या दोन देशातील करारामुळे भारतीय उद्योजकांना व्यापार विषयक दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा :
“हनी ट्रॅप’ च्या ट्रॅक मध्ये जेव्हा आमदारच अडकतो!
लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला, नंतर एकाला मारहाण करत जबरी चोरी
बायकोचा गळा दाबून हत्या केली, मृतदेह ६० किमी दूर खड्ड्यात फेकला, महिलेसोबत…