भविष्य कर्मचारी निधी संघटनेची शिखर संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज यांची महत्त्वपूर्ण बैठक सध्या सुरू असून, देशातील कोट्यवधी पेन्शनधारकांसाठी(Pension) आनंदाची बातमी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत पेन्शन दुप्पट होऊ शकते किंवा किमान ₹1,000 रुपयांची वाढ केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र, अधिकृत घोषणा होईपर्यंत यावर निश्चित काहीही सांगता येणार नाही. तसेच EPFO 3.0 या नवीन उपक्रमाची घोषणा देखील या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने शेवटचा किमान पेन्शन वाढीचा निर्णय 2014 मध्ये घेतला होता. त्यानंतर महागाईत झालेली मोठी वाढ आणि खर्चात झालेली भर पाहता, निवृत्तीधारकांनी आणि कामगार संघटनांनी सतत पेन्शन वाढवण्याची मागणी केली आहे. सध्या EPFO सदस्यांना एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 अंतर्गत दरमहा फक्त ₹1,000 पेन्शन मिळते. वाढत्या महागाईमुळे ही रक्कम अत्यंत अपुरी असल्याचे निवृत्तीधारकांचे म्हणणे आहे. रोजच्या गरजा भागवणेही या रकमेवर शक्य नसल्याने सरकारकडून पेन्शन वाढीची अपेक्षा वाढली आहे.

कामगार मंत्रालयाकडून या संदर्भात प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, पेन्शन वाढीबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. याआधी फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या बैठकीत पेन्शन वाढीचा मुद्दा चर्चेत आला होता, मात्र त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता. जवळपास नऊ महिन्यांनंतर बेंगळुरूमध्ये 11 ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही बैठक कालपर्यंत चालली असून, त्यातील अधिकृत अपडेट अद्याप आलेला नाही.

दरम्यान, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी त्यांच्या ‘X’ पोस्टद्वारे EPFO च्या 238व्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले —

ईपीएफ खात्यातून अंशतः रक्कम काढण्याची सुविधा वाढवणे

विश्वास योजनेअंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा भार कमी करणे

पेन्शनधारकांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेवा घरपोच उपलब्ध करून देणे

EPFO 3.0 या आधुनिक प्रणालीस मंजुरी देणे

तथापि, पेन्शन(Pension) वाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा या पोस्टमध्ये करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज या विषयावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पेन्शन संघटनाही या बैठकीतील निकालावर बारकाईने नजर ठेवून आहेत, आणि निवृत्तीधारकांमध्ये नव्या घोषणेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

पुन्हा संकट..शेतकऱ्यांच्या पोटात गोळा,पाऊस पुन्हा झोडपणार हवामान खात्याचा इशारा
टॅरिफ युद्धानंतर भारतासाठी पहिल्यांदाच ‘गुडन्यूज’, वाचा काय आहे निर्णय!
Rohit Sharma होणं सोपं नाही! अय्यरने केला अपमान, पण ‘हिटमॅन’ने दिला मान….