देशभरात सोशल मीडियावर एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना तीन महिन्यांचे मोबाइल रिचार्ज(recharge) मोफत देण्याची घोषणा केली असल्याचा दावा करण्यात आला होता. या व्हिडिओमुळे अनेक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तपासाअंती हे समोर आले आहे की हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार करण्यात आला आहे.

न्यूजचेकर वेबसाईटने या व्हिडिओचे फॅक्ट चेक केले असता, त्यातील ऑडिओ अस्वाभाविक आणि एकसुरी असल्याचे आढळले. तसेच पंतप्रधान मोदी आणि न्यूज अँकर यांच्या ओठांच्या हालचालींशी व्हिडिओतील आवाज जुळत नाही, यावरून हा व्हिडिओ AI जनरेटेड असल्याचे स्पष्ट होते. याशिवाय, “PM Narendra Modi Free Recharges” या कीवर्डसह शोध घेतल्यानंतर देखील अशा कोणत्याही सरकारी घोषणेचा किंवा अधिकृत बातमीचा पुरावा सापडला नाही.
केंद्र सरकारच्या मायस्कीम पोर्टल आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो यांच्या वेबसाइटवरही या कथित योजनेविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्याचबरोबर, PIB Fact Check ने २८ सप्टेंबर २०२५ रोजी एक पोस्ट शेअर करून स्पष्ट केले आहे की “पंतप्रधान मोदी सर्व भारतीय युजर्सना तीन महिने मोफत मोबाइल रिचार्ज(recharge) देत असल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.” तसेच नागरिकांना इशारा देत म्हटले आहे की अशा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका आणि वैयक्तिक माहिती अज्ञात स्त्रोतांशी शेअर करू नका.सरकारने पुन्हा एकदा जनतेला आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही दाव्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत सरकारी चॅनेलवरून त्याची पडताळणी करावी, अन्यथा फसवणुकीचा धोका संभवतो.

हेही वाचा :
गुंतवणूकदार मालामाल होणार, ही कंपनी एकावर 1 शेअर फ्री देणार
ट्रकची धडक बसल्यावर तरुणीसोबत जे घडलं पाहून तुम्हीही व्हाल चकित, Video Viral
मोबाईलचा बॅलन्स झीरो ? तरीही करता येईल कॉल..