राज्यात आणि देशभरात(country) हवामानाने अक्षरशः पलटी मारली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला पावसाने झोडपल्यानंतर आता कडाक्याच्या थंडीची चाहूल लागली आहे. भारतीय हवामान विभागाने 12 आणि 13 नोव्हेंबरसाठी मोठ्या थंडीचा आणि पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांमध्ये पुढील 24 तास हवामानात मोठा बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरण सतत बदलत असून काही भागांत अजूनही हलक्या पावसाची नोंद होत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट सुरू झाली आहे तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा झपाट्याने खाली आला आहे. चंदीगड, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पुढील काही दिवस प्रचंड गारठा जाणवणार असल्याचं IMD ने सांगितलं आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये आधीच थंडीचा कडाका जाणवतो आहे. धुळे, जळगाव, नाशिक, निफाड, परभणी आणि जेऊर या ठिकाणी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.त्याचबरोबर तामिळनाडू आणि केरळच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाजही वर्तवला गेला आहे.अरबी समुद्रात केरळ किनाऱ्याजवळ 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. यामुळे दक्षिणेकडील हवामानावर परिणाम होऊन पुढील काही दिवस राज्यात थंडीचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुण्यात आता 13.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे, तर नागपूर, नाशिक आणि जळगावमध्येही तापमान झपाट्याने खाली येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर किमान तापमान सातत्याने घसरत आहे.हवामान खात्याने पुढील काही दिवसांत राज्यातील(country) किमान तापमानात 4 ते 5 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
12 आणि 13 नोव्हेंबर हे दोन दिवस राज्यासाठी हवामानदृष्ट्या निर्णायक ठरणार आहेत. काही भागांमध्ये थंडीची लाट आणि धुक्याचे प्रमाण वाढेल, तर दक्षिण महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. तापमानात मोठी घट आणि गारठ्याची वाढ होण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करावा आणि सकाळच्या थंड वार्यापासून स्वतःचा बचाव करावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा :
इचलकरंजी मधील शहापूर येथे पाव किलो गांजा जप्त…
पुढच्या 48 तासांत या राशींचं नशीब पालटणार…
जुनी कार विकताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा, अन्यथा येऊ शकते मोठी अडचण!