बांग्लादेशच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडवत तारिक रहमान (Bangladeshi politics) यांनी २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शानदार विजय मिळवत प्रभावी पुनरागमन केले आहे. तब्बल १७ वर्षे परदेशात राहिल्यानंतर निवडणुकीच्या काही दिवस आधी ते मायदेशी परतले आणि त्यांच्या आगमनानंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. निकाल जाहीर होताच बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी ला स्पष्ट आणि एकतर्फी बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले असून, तारिक रहमान यांचे पंतप्रधानपद जवळपास निश्चित मानले जात आहे.

या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व (Bangladeshi politics) त्यांनी प्रथमच स्वतः केले. प्रचाराची रणनीती, उमेदवारांची निवड आणि निवडणूक मोहिमेची संपूर्ण रूपरेषा त्यांनी आखली होती. स्वतः दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवत दोन्ही ठिकाणी विजय मिळवून त्यांनी आपल्या नेतृत्वावर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचे दाखवून दिले. सुमारे दोन दशकांनंतर पक्षाला पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्यात त्यांना यश आले आहे.
तारिक रहमान हे देशातील प्रभावशाली राजकीय कुटुंबातील वारसदार नेते मानले जातात. ते माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे सुपुत्र असून, त्यांच्या वडिलांचे नावही बांग्लादेशच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे आहे. झियाउर रहमान हे बांग्लादेशचे माजी राष्ट्रपती आणि बीएनपीचे संस्थापक होते. या पार्श्वभूमीमुळे तारिक रहमान यांना अनेकदा “क्राउन प्रिन्स ऑफ बांग्लादेश” असेही संबोधले जाते.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीत वादळेही कमी नव्हती. २००७ नंतर त्यांच्या (Bangladeshi politics) विरोधात भ्रष्टाचार, मनी लॉन्डरिंग आणि २००४ मधील ढाका ग्रेनेड हल्ल्यासारख्या गंभीर आरोपांशी संबंधित अनेक खटले दाखल झाले. बीएनपीने हे सर्व खटले राजकीय सूडबुद्धीने दाखल केल्याचा आरोप केला होता. २०२४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारच्या पतनानंतर न्यायालयीन प्रक्रियेत मोठी घडामोड झाली आणि बहुतेक प्रकरणांत त्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर २०२५ च्या अखेरीस त्यांनी लंडनमधील वास्तव्यानंतर स्वदेशात पुनरागमन केले.
तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बीएनपीने दोन-तृतीयांश बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. या विजयामुळे बांग्लादेशच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. आता सर्वांचे लक्ष त्यांच्या संभाव्य शपथविधीकडे लागले असून, आगामी काळात ते देशाच्या धोरणांमध्ये कोणते बदल घडवून आणतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असेल.
हेही वाचा :
मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य
कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?
मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?