दक्षिणेतील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री साई पल्लवी(Sai Pallavi) तिच्या साधेपणा, सहजसुंदर व्यक्तिमत्त्व आणि नो-मेकअप लूकमुळे ओळखली जाते. पडद्यावर दिसणाऱ्या पारंपरिक, भावनिक आणि नैसर्गिक अभिनयामुळे तिने दक्षिणेत प्रचंड लोकप्रियता मिळवली.

आता ती हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. बहुचर्चित ‘रामायण’ या मेगा प्रोजेक्टमध्ये साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारणार असून रणबीर कपूर तिच्यासोबत प्रभू श्रीरामच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी प्रदर्शित होणारा हा चित्रपट भव्य सेट्स, तगडी स्टारकास्ट आणि उत्कृष्ट संगीतामुळे प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. मात्र चित्रपट रिलीज होण्यास अजून बराच अवधी असतानाही, साई पल्लवी एका वैयक्तिक कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
साई पल्लवी(Sai Pallavi) आणि तिची बहीण पूजा या नुकत्याच सुट्टीसाठी परदेशात गेल्या होत्या. सुट्टीतील क्षण टिपणारे काही फोटो पूजाने इंस्टाग्रामवर शेअर केले. “Beach high #sunkissed” अशी कॅप्शन देत तिने या फोटोंमध्ये बहिणीसोबतचा बीचवरील आनंदी वेळ दाखवला. फोटोंमध्ये दोन्ही बहिणी स्विमसूटमध्ये, समुद्रकिनाऱ्यावर निवांत हसताना दिसल्या. हे फोटो काही तासांतच व्हायरल झाले. मात्र त्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया दोन टोकांच्या होत्या.
अनेक युजर्सनी साई पल्लवीच्या या लुकवर टीका केली. एका युजरने लिहिलं: ‘पडद्यावर इतकी पारंपरिक भूमिका करते, पण खऱ्या आयुष्यात बिकिनी घालते. दुटप्पीपणा वाटतो.’ दुसऱ्याने कमेंट केली: ‘यावरून सिद्ध होतं की ती इतर नायिकांपेक्षा वेगळी नाही, सारखीच आहे.’ तर आणखी एका युजरने म्हटलं: ‘जर साई पल्लवीसारखी अभिनेत्री बिकिनीमध्ये दिसणार असेल, तर भारतीय संस्कृतीचे रक्षण कोण करणार?’ या सर्व टीकांमुळे सोशल मीडियावर वादाची ठिणगी पडली आहे.
मात्र सगळेच चाहते नकारात्मक नाहीत. काहींनी तिच्या बाजूने आवाज उठवला आहे. ‘ही तिच्या वैयक्तिक आयुष्याची गोष्ट आहे. पडद्यावरील भूमिका आणि खऱ्या आयुष्यातील निवड यात फरक आहे.’ ‘तिला काय घालायचंय हा तिचा निर्णय आहे. अभिनयामुळे तिला आदर मिळतो, कपड्यांमुळे नाही.’ अशा प्रतिक्रिया देत अनेक चाहत्यांनी साई पल्लवीला पाठिंबा दर्शवला आहे.

साई पल्लवी(Sai Pallavi) ‘रामायण’मध्ये सीता मातेच्या भूमिकेत झळकणार असल्याने तिच्याकडून चाहते खूप मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत. त्यामुळेच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अशा फोटोंवर काही चाहत्यांचा आक्षेप असल्याचे स्पष्ट दिसते. पारंपरिक भूमिकेशी प्रेक्षक भावनिकरीत्या जोडलेले असतात, आणि त्यामुळेच वास्तव आयुष्यातील लुक किंवा निर्णयावरून नायिकांना वारंवार ट्रोल व्हावं लागतं.
या फोटोंमुळे सोशल मीडियावर वातावरण दोन गटात विभागलं गेलं आहे. एक गट तिला भारतीय संस्कृती आणि ‘सीतेच्या भूमिकेला शोभेल असं वर्तन’ करण्याचा सल्ला देत आहे. तर दुसरा गट ‘अभिनय आणि वैयक्तिक आयुष्य यांची गल्लत करू नका’ असं म्हणत तिचं समर्थन करत आहे. साई पल्लवी या वादावर अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण इतकं मात्र नक्की की, रामायण रिलीजपूर्वीच तिचं नाव चर्चेत आलं आहे. चाहत्यांच्या अपेक्षा आणि ट्रोलर्सच्या टीका यामध्ये साई पल्लवी कशी भूमिका घेते, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल.
हेही वाचा :
फेस्टिव्हल सीझनमध्ये ५ नवीन SUV आणि Sedan दाखल होणार
क्रिकेटला अलविदा; वेगवान गोलंदाज खेळाडूच्या निर्णयानं क्रिकेट जगत हैराण!
वाहतुक कोंडी कायमची सुटणार? अजित पवार सर्वात मोठा निर्णय घेणार