बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोघींनी एकत्र येत नवीन टॉक शो ‘टू मच’ सुरु केला आहे. त्यांच्या या शोचा पहिला एपिसोड 25 सप्टेंबरपासून प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार असून त्याचा एक भन्नाट टीझर नुकताच समोर आला आहे. पहिल्याच भागासाठी निर्मात्यांनी बॉलिवूडचे दोन सुपरस्टार सलमान खान आणि आमिर खान यांना आमंत्रित केले आहे.सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पहिल्या शोच्या टीझरमध्ये असे दिसत आहे की, या दोन्ही दिग्गज अभिनेत्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पहिल्यांदाच खुल्या मनाने चर्चा केली आहे.

आमिर खानने सलमान खानबरोबरच्या आपल्या मैत्रीबद्दल सांगताना म्हटले की, ‘खरं सांगायचं तर माझी पहिली पत्नी रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाच्या काळात सलमान खान पहिल्यांदा माझ्या घरी आला होता. त्यादिवसापासून आमची मैत्री जुळली. त्याआधी मला वाटायचं की सलमान वेळेवर येत नाही, विशेषत: ‘अंदाज ‘अपना-अपना’च्या शूटिंगदरम्यान यामुळे त्रास व्हायचा. आमिर खान पुढे म्हणाला की, ‘मी सुरुवातीला सलमानबद्दल खूप जजमेंटल होतो. मी त्याच्यावर अन्यायकारकपणे कठोर मत मांडायचो’.
या शोमध्ये सलमान खाननेदेखील आपल्या नातेसंबंधांबद्दल स्पष्टपणे बोलताना सांगितले की, ‘जेव्हा पार्टनर एकमेकांपेक्षा जास्त पुढे जातात, तेव्हा मतभेद सुरु होतात. माझ्या मते दोघांनी एकत्र पुढे जायला हवं आणि आयुष्यात एकमेकांना साथ द्यायला हवी’. त्याचवेळी आमिर खानने सलमान खानला त्याच्या नातेसंबंधांबद्दल विचारले असता सलमान खान म्हणाला की, ‘जर रिलेशन चाललं नाही, तर नाही चाललं. यामध्ये दोष जर कुणाचा असेल, तर तो माझा आहे’.
सलमान खानने या शोमध्ये एक मोठं वक्तव्य करताना सांगितलं की, ‘आता मला वडील व्हायचं आहे आणि मी लवकरच वडील होणार आहे’. त्याच्या या विधानानंतर सध्या सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. सलमान आणि आमिर खाननंतर काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या या शोमध्ये दर गुरुवारी नवा एपिसोड प्रदर्शित होणार आहे. पुढील भागांत विक्की कौशल, कृति सेनन, आलिया भट्ट, करण जौहर, गोविंदा, चंकी पांडे यांसारखे अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळतील.

हा काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या होस्ट केलेला अनस्क्रिप्टेड टॉक शो आहे, ज्यात सेलिब्रिटी गेस्ट्ससोबत हास्य, खुल्या चर्चा आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले जाते. हा शो स्त्री दृष्टिकोनातून जीवन, प्रसिद्धी आणि समाजावर प्रकाश टाकतो.शोचा पहिला एपिसोड २५ सप्टेंबर २०२५ रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. दर गुरुवार नवा एपिसोड येईल आणि तो २४० देशांमध्ये स्ट्रीम होईल.पहिल्या एपिसोडमध्ये बॉलिवूडचे (Bollywood)सुपरस्टार सलमान खान आणि आमिर खान दिसणार आहेत. ते आपल्या मैत्री, चित्रपट स्मृती आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल खुल्या मनाने बोलताना दिसतील.
हेही वाचा :
का साजरा केला जातो जागतिक फार्मासिस्ट दिन? जाणून घ्या
अभिषेक शर्माची फटकेबाज अर्धशतकी खेळी; फ्लाइंग किसने रंगत वाढवली!
जया बच्चन यांनी अभिनेत्याला बेदम मारलं तेव्हा…