कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
मतदार यादी मधील दोष, चुका काढून मगच निवडणुका घ्या, निर्दोष मतदार यादी तयार होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला या विरोधकांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत राज्या निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 246 नगरपरिषदा, आणि 42 नगरपंचायतीसाठी दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान आणि दिनांक 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे(Political). निवडणुकांची अधिसूचना जाहीर झाल्यामुळे राज्यातील आणि जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्हाही त्याला अपवाद नाही. गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगुड, पन्हाळा, शिरोळ, पेठवडगाव या पालिका आणि आजरा व चंदगड या नगरपंचायतीसाठीप्रचाराचा धुरळा उडणार आहे.

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला. या मेळाव्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेतील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. बुधवारी झालेला मेळावा हा प्रचाराचा शुभारंभ ठरलेला आहे. दिनांक 7 नोव्हेंबर रोजी उबाठा गटाच्या शिवसेनेचा मेळावा शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात होणार असून त्याला शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. आज एका जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे आणि केंद्राचे मंत्री तसेच आमदार खासदार, विधानसभेचे सभापती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात प्राथमिक पातळीवरची चर्चा केली. त्यामुळे बुधवारपासूनच निवडणुकांचा माहोल तयार झाला आहे असे म्हणता येईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयुक्तांनी मंगळवारी जाहीर केल्यानंतर आता नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका होऊन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात येणार आहे.या छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समोर अडचणींचा डोंगर आहे. मूलभूत सुविधांचा दुष्काळ आहे. पण आता किमान लोकप्रतिनिधी अधिकारावर येत असल्यामुळे हे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचा आणि विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल. येत्या पाच वर्षात मूलभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याचे आव्हानात्मक काम नव्यालोकप्रतिनिधींना करावे लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी सहा महिने किंवा वर्षभराने घेतल्या तरी काही बिघडत नाही, पण होणाऱ्या निवडणुका निर्दोष मतदार यादींवरच झाल्या पाहिजेत अन्यथा आम्ही या निवडणुका होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे.
त्यासाठीच दिनांक एक नोव्हेंबर रोजी मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विरोधकांनी दुबार मतदारांचा महत्त्वाचा प्रश्न मांडला होता. निवडणूक आयुक्तांनी त्याची गांभीर्याने दखल घेतलेली दिसते. कारण मतदार म्हणून दुबार नोंदणी असलेल्या मतदारांच्या नावापुढे दोन स्टार असणार आहेत. मतदान करताना या मतदारांनी दुसऱ्या ठिकाणी पुन्हा मतदान करणार नाही अशा प्रकारचे शपथ पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे दुबार मतदानास आळा बसेल. याशिवाय एकाच निवासस्थानी मतदारांची असलेली समस्यास्पद संख्या प्रत्यक्ष त्या निवासस्थानी जाऊन पडताळून पाहिली जाणारआहे.समस्यास्पद मते रद्द केली जाणार आहेत. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा निवडणूक आयुक्तांनी कार्यरत केली आहे.
नगरपरिषदा आणि नगरपंचायत तिचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता इतर निवडणुका निर्धारित वेळेत आणि काळातच घेतल्या जातील. त्यापुढे ढकलल्या जाणार नाहीत असा संदेशच निवडणूक आयुक्तांनी महाविकास आघाडी वमनसेला दिला आहे. त्यामुळे निषेध व्यक्त करीत या सर्वांना स्थानिक(Political) स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जावे लागेल. त्यांच्यासमोर अन्य कोणताही पर्याय नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही सदोष मतदार याद्या हा विषय घेऊन न्यायालयात दाद मागण्याचा विचार बोलून दाखवला असला तरी, त्याचा काही उपयोग होईल असे दिसत नाही. कारण याच संदर्भातील काही याचीका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेल्या आहेत.

हेही वाचा :
PhonePe वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! कंपनीने केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा
बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीची हीच योग्य वेळ? पडझडीचा होणार फायदा
एक महिना सलग मीठ न खाल्ल्यास काय होईल?