दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर कोल्हापूर पोलिस(Security) यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, आदमापूर, नृसिंहवाडी, खिद्रापूर याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज जलद प्रतिसाद पथके ही तैनात करण्यात आली असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलिस दल सज्ज आहे.

पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू आणि अण्णासाहेब जाधव यांनी मंगळवारी शहर आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी अंबाबाई मंदिर परिसरातील सुरक्षा तपासली आणि संबंधित अधिकाऱ्यांना अतिरिक्त बंदोबस्त, शस्त्रधारी जवान आणि सीसीटीव्ही प्रणाली तातडीने अद्ययावत करण्याचे निर्देश दिले.

रंकाळा तलाव, पन्हाळा किल्ला, राधानगरी अभयारण्य, गगनगड, रांगणा, भुदरगड, पारगड, सामानगड या पर्यटन स्थळांवर देखील पोलिसांचा सतर्क पहारा ठेवण्यात आला आहे. शहरातील तावडे हॉटेल, ताराराणी चौक, संभाजीनगर, मध्यवर्ती बसस्थानक, कसबा बावडा, शिवाजीपूल, उजळाईवाडी उड्डाणपूल आणि नवीन वाशी नाका परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची काटेकोर तपासणी सुरू केली आहे. महामार्गांवरही गस्त वाढवण्यात आली आहे.

गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलिस (Security)अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी नृसिंहवाडी आणि खिद्रापूर येथील धार्मिक स्थळांना भेट देऊन सुरक्षा तयारीचा आढावा घेतला. जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.एकूणच, दिल्लीतील घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा पोलिसांकडून कोणतीही ढिलाई न ठेवता सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात आली असून, नागरिकांनीही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा :

भारतात लाँच होणार दमदार OnePlus 15, पॉवरफूल चिप अन् 7300mAh ची बॅटरी
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…
 ट्रम्पच्या निर्बंधांमुळे भारताचा मोठा निर्णय…