राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सकाळी गारठा आणि दुपारी कडक उन्हाचा अनुभव नागरिक घेत आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात मोठी घट झाली असून महाराष्ट्रातील अनेक भागात गुलाबी थंडीची लाट(wave) पसरली आहे. राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये किमान तापमान अकरा अंशांखाली आल्यानं हवेत थंडीची चाहूल अधिक गडद झाली आहे.विशेषतः उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक जाणवू लागला असून पुढील काही दिवस हा गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी राज्यातील काही निवडक जिल्ह्यांसाठी ‘थंडीची लाट’ कायम राहील, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

राज्यातील काही भागांमध्ये किमान तापमान दहाच्या खाली गेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथे तब्बल 9 अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदले गेले. निफाडमध्ये 9.2 अंश तर जळगावमध्ये 9.5 अंशांपर्यंत पारा खाली आला. ही तिन्ही ठिकाणे थंडीची लाट मानण्यासाठी लागणारी निकष पूर्ण करत असल्याने हवामान विभागाने ‘कडाक्याच्या थंडीचा’ इशारा जारी केला आहे.याशिवाय महाबळेश्वर, नाशिक आणि गोंदिया येथेही किमान तापमान 11 अंशांखाली नोंदले गेले. यामुळे या भागांमध्ये सकाळच्या वेळी गारठा अत्यंत प्रकर्षाने जाणवत आहे. हवामान विभागाचे निरीक्षण दर्शवते की, पुढील 24 ते 48 तासांमध्ये या भागांत थंडीची तीव्रता आणखी वाढू शकते.

राज्याच्या विविध भागांत तापमानात लक्षणीय फरक दिसून येत आहे. कोकण किनारपट्टीवर थंडीचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी इतर विभागांमध्ये तापमानात मोठी घट झालेली दिसते. कोकणात दुपारचे तापमान 34.6 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचत आहे, तर पहाटेच्या सुमारास गारवा जाणवतो.उत्तर महाराष्ट्रात(wave) सरासरी किमान तापमान 9.2 अंश, तर पश्चिम महाराष्ट्रात 9 अंश नोंदले गेले आहे. विदर्भात तापमान 10.5 अंश तर मराठवाड्यात 11 अंशांच्या आसपास आहे. थंडी आणि उन्हाचा हा परस्परविरोधी अनुभव नागरिकांना दररोज जाणवत असल्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जळगाव , नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर , विदर्भातील काही जिल्हे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील निवडक भागांमध्ये आजही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी पाऱ्यात अचानक घसरण होत असल्याने नागरिकांनी उबदार कपडे वापरणे, लहान मुले आणि ज्येष्ठांनी थंडीपासून बचाव करणे, अशी सूचना करण्यात आली आहे.राज्यातील बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकला आणि तापासारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने आरोग्यतज्ज्ञ सतर्कता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची तीव्रता कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

ही वाचा :

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिली गार्लिक लच्छा पराठा, नोट करून घ्या रेसिपी
हिवाळ्यात दररोज बाजरीची लापशी खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे
शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला — उमाकांत दाभोळे यांच्याकडून महापालिका आयुक्तांकडे तातडीने धूरफवारणीची मागणी