महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील पहिला बिनविरोध निकाल सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपरिषदेचा लागला असून, भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या बिनविरोध विजयी ठरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने ही निवडणूक थेट पाटील कुटुंबाच्या बाजूने सरकली. मात्र या विजयापेक्षाही मोठी चर्चा रंगली ती पाटील कुटुंबातील ज्येष्ठ सुपुत्र बाळराजे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची. कधीकाळी पवार परिवाराचे निष्ठावंत मानले जाणारे पाटील यांच्या घरातील बाळराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट एकेरी उल्लेखात “अजित पवार…सगळ्यांचा नाद करायचा, पण अनगरकरांचा नाद नाही करायचा” असे आव्हानात्मक उद्गार काढत राजकीय वातावरण (leader)तापवले.

राज्यात व्हायरल झालेल्या या व्हिडीओने वादाची ठिणगी पडताच आज राजन पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मुलाच्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “ही निवडणूक(leader) पहिल्यांदाच होणार असल्याने तरुणांचा उत्साह वाढला होता. माझा मुलगा राजकीयदृष्ट्या लहान आहे आणि भावनेच्या भरात त्याच्या तोंडून अपशब्द निघाले. त्याचे समर्थन मी करू शकत नाही,” असे सांगत पाटील यांनी अजित पवारांची सार्वजनिक माफी मागितली. पाटील पुढे म्हणाले, “मोठे पवारसाहेब आणि अजितदादांनी आजपर्यंत आम्हाला खूप दिलं आहे. मी जरी बाजूला गेलो असलो तरी त्यांच्यामुळेच आमचं वैभव उभं राहिलं. बाळराजेंच्या तोंडून गेलेले शब्द योग्य नव्हते. त्याबद्दल मी अंतःकरणापासून क्षमा मागतो.”
राष्ट्रवादी कडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना पाटील यांनी आवाहन केले की हा वाद इथेच थांबवावा. “चुकलेला मुलगा आपण पदरात घेतोच… त्याप्रमाणे अजितदादांनीही माझ्या मुलाची चूक पदरात घ्यावी,” असे म्हणत त्यांनी पवार परिवाराशी असलेला आदराचा धागा पुन्हा अधोरेखित केला.

हेही वाचा :
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंड माहिका शर्मासह केली हनुमान पूजा
त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral