राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे, महात्मा गांधींच्या राजकीय (Mahayuti)मार्गदर्शकांचे गाव, आणि गैबी चौकातून घडणाऱ्या प्रखर राजकीय हलचाली सुरु आहेत. पक्षीय नव्हे तर निव्वळ गटांच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या कागलमध्ये सध्या ‘राजकीय ब्लॅक कॉमेडी’चं रंगमंच उभं राहिलं आहे. “रोटी-बेटी व्यवहारही नाही” इतकी कट्टर गटबाजी असलेल्या कागलमध्ये गेल्या पन्नास वर्षांत कधीही न पाहिलेलं दृश्य गटांचे प्रमुख हसन मुश्रीफ आणि समरजीतसिंह घाटगे यांनी हातमिळवणी करून सर्वांनाच चक्रावून टाकलं आहे.

“आम्ही सत्तेसाठी नव्हे, तर कागलच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत,” असं दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र आचार्य अत्रे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, “गेल्या दहा हजार वर्षांत आणि पुढच्या दहा हजार वर्षांत लोकांना पागल करणारे असं राजकारण होणार नाही,” अशी परिस्थिती कागलमध्ये निर्माण झाली आहे. इतिहासात प्रथमच कट्टर प्रतिस्पर्धी गटांचे नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घाटगेंची समजूत काढून त्यांना लोकसभेची खात्री दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असले तरी, याला ठोस आधार नाही.

घाटगेच्या निर्णायक पावलावर निष्ठावंत कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेणारे घाटगे, यावेळी मात्र त्यांनाच वाऱ्यावर सोडत असल्याची भावना उघडपणे उमटत आहे. “विकासासाठी एकत्र आलो या स्पष्टीकरणावर गैबी चौकातील शेबडं पोरगसुद्धा विश्वास ठेवणार नाही, अशी चुटकी कार्यकर्त्यांकडून घेतली जात आहे. आगामी निवडणूक काळात हा ‘ब्लॅक कॉमेडी ‘चा खेळ कोणाच्या वाट्याला फायदेशीर ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

अगदी सुरुवातीला राजे विक्रमसिह घाटगे विरुद्ध सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ, हसन मुश्रीफ विरुद्ध सदाशिवराव मंडलिक, संजय घाटगे विरुद्ध सदाशिवराव मंडलिक, संजय मंडलिक विरुद्ध हसन मुश्रीफ असे गटातटाचे राजकारण या तालुक्याने पाहिले आहे. इथे पक्षीय लेबल असूनही राजकारण मात्र गटनिहाय होते आणि आजही आहे.

मुश्रीफ यांनीही तितकेच विरोधाचे राजकारण केले होते. कागलच्या या जुळवाजुळवीवर महायुतीतीलच स्वराजकारण तापले आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांनी युती धर्माची तमा न बाळगता मुश्रीफावर कडक टीका केली आहे. “माणसाचा उपयोग करून, काम संपलं की फेकून देणं ही मुश्रीफांची(Mahayuti) राजकीय नीती आहे. अशा वापरा आणि फेकून द्या प्रवृत्तीच्या मागे आम्ही जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे आता मंडलिक यांच्या पाठीशी पालकमंत्री आबिटकर उभे राहिल्याने समीकरणं आणखी गुंतागुंतीची बनली आहेत. एकूणच, गटबाजीची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागलमध्ये सध्या राजकीय पातळीवर अशी उलथापालथ सुरू आहे की, कार्यकर्ते चक्रावले आहेत, नेतृत्व गोंधळले आहे आणि महायुतीत अंतर्गत भूकंप निर्माण झाल्याची स्थिती आहे.

हेही वाचा :

अपचनाची समस्या आहे? मग दररोजच्या जीवनशैलीमध्ये करा फक्त हा बदल…
खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट? VIDEO खरा की खोटा?
सोनाक्षी सिन्हा हिचे प्रेग्नंसीबद्दल अत्यंत मोठे विधान, थेट म्हणाली, हा मी प्रेग्नंट..