इचलकरंजी शहरात अल्पवयीन(Minor) मुलीशी कथित अश्लील वर्तन केल्याप्रकरणी बाबासाहेब बांदार (रा. तोरणा नगर, सहारा निवारा कॉलनी, ता. हातकणंगले) या इसमाविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास झालेला विलंब आणि संशयित आरोपीविरुद्ध कारवाईत झालेल्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांत तीव्र संताप उसळला. यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी शहापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. संतप्त नागरिकांनी संशयित आरोपीच्या घरावरही तोडफोड केली, त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

मालेगावमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद अद्याप सुरू असतानाच इचलकरंजीत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. आरोपी आणि पीडित अल्पवयीन(Minor) मुलगी हे दोघेही एकाच परिसरात राहत असून आरोपीच्या घरातच किराणा दुकान आहे. मुलगी खाऊ घेण्यासाठी दुकानात गेल्यानंतर आरोपीने तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने काही काळ सत्य लपवले. मात्र आईने विश्वासात घेतल्यानंतर तिने संपूर्ण माहिती दिली.
त्यानंतर फिर्यादी कुटुंबाने तात्काळ शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली असता, पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त नागरिकांनी हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधला. शहरातील विविध संघटनांनी एकत्र येत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला आणि पोलीस प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप ठेवत निषेध व्यक्त केला.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकारी आणि आमदार राहुल आवाडे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांनी सत्य परिस्थिती जाणून घेतल्यानंतर थेट शहापूर पोलीस ठाण्यात पोहोचून अधिकारी वर्गाची जाब विचारणा केली. यावेळी आमदार आवाडे यांनी आरोपीविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या गंभीर प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची तात्काळ बदली करावी, असा ठाम आग्रह व्यक्त केला. हे सर्व प्रकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान पोलिस प्रशासनाने घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपी बाबासाहेब बांदार याच्यावर बीएनएस कलम 73, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिक सतर्क आहेत आणि आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा :
अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 4 जण गंभीर जखमी
कारच्या छतावर डान्स करण्याचा तरुणांचा स्टंट; चालकाने ब्रेक मारताच हवेत उडाले अन्…, VIDEO VIRAL
कोल्हापुरात‘घाटगे–मुश्रीफ विरुद्ध मंडलिक’सामना; कागलच राजकारण तापणार