मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या(elections) पार्श्वभूमीवर आता ‘मुंबई’ आणि ‘बॉम्बे’ नावांवरुन नव्या वादाला तोंड फुटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन आता भारतीय जनता पार्टीने राज यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थान म्हणजेच आयआयटीच्या नावातील ‘बॉम्बे’चा उल्लेख न काढल्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी केलेल्या पोस्टला भाजपाने उत्तर दिलं आहे. नेमकं भाजपाने काय म्हटलंय जाणून घेऊयात..

“केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं’. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय आणि ही मानसिकता काय आहे? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
“खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना ‘मुंबई’ हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय,” असं राज यांनी म्हटलंय.
“आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार. ‘मुंबई’ नको ‘बॉम्बे’च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे! तेव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच!
आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं,” असंही राज यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
“बॉम्बे ते मुंबई नामांतराचा इतिहास भाजपचा; राज ठाकरेंना सोईस्कर विसर” असं म्हणत भाजपाने राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे. राज ठाकरेंच्या या पोस्टवरुन भाजपाने राज(elections) ठाकरेंना सुनावलं आहे. भाजपाचे प्रसार माध्यम समन्वयक नवनाथ बन यांनी राज ठाकरेंच्या ‘एक्स’ पोस्टला रिप्लाय केला आहे. “आदरणीय राज ठाकरेजींचं अलीकडचं राजकारण ‘फॅक्ट्स’वर नाही, तर केवळ ‘फ्रीस्टाईल आरोपां’वर आधारित आहे. खरंतर ‘बॉम्बे’चं अधिकृत नामांतर ‘मुंबई’ करण्याचा निर्णय राज्यातील शिवसेना–भाजप सरकारनंच घेतला. या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळवून तो पूर्ण देशभर वैधानिकपणे लागू करणारे व्यक्ती म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामभाऊ नाईक,” असं नवनाथ बन यांनी म्हटलं आहे.
“संसदेत पहिल्यांदा ‘बॉम्बे’ ऐवजी ‘मुंबई’ असा उल्लेख करून हा बदल राष्ट्रीय पातळीवर स्थिर करणारेही भाजपचे राम नाईकच होते. पण राज ठाकरे यांना त्यांचा सोईस्कर विसर पडलेला दिसतोय. कदाचित उद्धवजी ठाकरेंसोबत आघाडी करायची असल्यानं ते आपल्या मूळ भूमिका विसरण्याचा किंवा उद्धवजींप्रमाणे यू-टर्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकार मुंबई–एमएमआरला जागतिक दर्जाचं कनेक्टिव्हिटी नेटवर्क देत असताना, काहींना राजकीय चक्कर येते, म्हणून गुजरातचा मुद्दा पुढे आणला जातो. खरं तर केंद्र सरकार मुंबई–एमएमआरच्या विकासासाठी मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. मेट्रो, बुलेट ट्रेन, कॉस्टल रोड कनेक्टिव्हिटी, मल्टीमोडल कॉरिडोर्स या प्रकल्पाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक राजधानीला जागतिक स्तरावर नेण्याची क्षमता आहे,” असं बन यांनी नमूद केलं आहे.
“विकासाचे हे प्रकल्प पाहून काहींची ‘राजकीय मळमळ’ वाढते, म्हणूनच गुजरातचा बोगस बागुलबुवा पुढे करून भीतीचं राजकारण केलं जात आहे. पण मराठी माणूस, मुंबईकर आशा राजकारणाला थारा देणार नाहीत ते यू-टर्न घेणाऱ्यांसोबत नाही तर महाराष्ट्राला क्रमांक एकवर घेऊन जाणाऱ्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहतील,” असा विश्वास बन यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :
कधी बहीण, कधी बायको, सलग 5 वर्षे अत्याचार अन् एक नकार…
भारतीयांसाठी खुशखबर! 2027 पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता
मटण खा त्यांचं, पण बटण दाबा आमचं… शिंदेंच्या मंत्र्याच्या विधानाची राज्यभरात चर्चा!