मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आज चौथ्या दिवशी पोहोचलं आहे. 29 ऑगस्ट रोजी लाखो मराठा बांधवांसह ते मुंबईत दाखल झाले, त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने(High Court) तातडीची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एमी फाउंडेशनच्या याचिकेसह गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकांवर आजच सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, सुट्टीच्या दिवशीदेखील हायकोर्ट उघडून ही सुनावणी घेतली जाणार आहे. न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल. यामुळे आज दिवसभर राज्याचं लक्ष हायकोर्टाच्या निर्णयाकडे लागलं आहे.
पोलिसांच्या अटी आणि न्यायालयाचे पूर्वीचे निर्देश :
मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासाठी पोलिसांनी काही अटी घालून परवानगी दिली होती. त्यात आंदोलन एका दिवसापुरतं मर्यादित ठेवणं, ठराविक गाड्यांनाच प्रवेश, 5 हजारांपेक्षा जास्त लोकांना सहभागी होऊ न देणं, ध्वनीक्षेपक व गोंगाट करणारी साधनं वापरण्यास मनाई, तसेच आंदोलनाच्या ठिकाणी स्वयंपाक अथवा कचरा टाकण्यास बंदी अशा अटींचा समावेश होता. त्याचबरोबर गणेशोत्सवाचा काळ असल्याने वाहतूक आणि धार्मिक भावनांचा आदर राखण्याचाही नियम होता.
मागील सुनावणीत हायकोर्टाने (High Court)सार्वजनिक जागा अनिश्चित काळासाठी अडवल्या जाऊ शकत नाहीत, असं स्पष्ट केलं होतं. तसेच आझाद मैदानात फक्त 5 हजार लोकांनाच परवानगी असल्याचं अधोरेखित केलं होतं. त्यामुळे आजच्या सुनावणीत या अटींचं पालन न झाल्यास कठोर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
मुंबईत वाहतूक कोंडी व बससेवा बंद :
मोठ्या संख्येने आंदोलक आझाद मैदानावर दाखल झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे. तसेच नरिमन पॉईंट, कुलाबा आणि मंत्रालय परिसरात जाणाऱ्या बसेस बंद केल्या गेल्या आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईत नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या घडामोडींमुळे न्यायालयाचा निर्णय हा केवळ आंदोलनावरच नाही, तर संपूर्ण मुंबईच्या दैनंदिन जीवनावरही मोठा परिणाम करणारा ठरणार आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी, आंदोलकांचा शेअर मार्केटमध्ये घुसण्याचा प्रयत्न
तुमचा Gmail पासवर्ड लगेच बदला! स्वत: गुगलनेच दिला वापरकर्त्यांना इशारा, धक्कादायक कारण…
फायरिंग अन् हाणामारी; भाजप महिला आमदार अन् तिच्या पतीवर हल्ला