कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव(Ganeshotsav) रस्त्यावर आलेला नव्हता. श्री गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूक सायंकाळी सहा वाजता समाप्त व्हायची. मिरवणुकीसाठी कोणताही एक मार्ग निश्चित करण्यात आलेला नव्हता. हलगी, बँड, लेझीम अशी पारंपारिक वाद्य संस्कृती तेव्हा होती. मिरवणुकीत ध्वनी यंत्रणा नामक प्रकारच वापरला जात नव्हता. विशेष म्हणजे मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी पाहायला मिळायची नाही. पण तेव्हा मोहरम हा सण प्रचंड उत्साहात आणि प्रचंड गर्दीत साजरा केला जात असे. हे आजच्या पिढीला माहित असणे शक्य नाही.

कोल्हापुरात मुस्लिम धर्मीयांचा मोहरम शहरातील पेठा पेठांमध्ये साजरा केला जात असे. पंजे भेटीच्या मिरवणुका पाहण्यासाठी शेवटच्या तीन दिवसात प्रचंड गर्दी उसळलेली असायची. भाऊसिंगजी रोड, बाबूजमाल रोड, बिंदू चौक, करवीर नगर वाचन मंदिर रोड, शिवाजी चौक, भवानी मंडप परिसर पानलाइन या परिसरात पंजे भेटीच्या मिरवणुका पाण्यासाठी दुतर्फा गर्दी व्हायची. विसर्जन मिरवणुकीला तर अलोट गर्दी होत असे. सुमारे 70 वर्षांपूर्वी शुक्रवार पेठ पोलीस चौकी समोर दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका युवकाचा मृत्यू झाला होता. या खून प्रकरणानंतर मोहरमच्या उत्सवाचे महत्व हळूहळू कमी होत गेले.
सार्वजनिक गणेशोत्सवाला(Ganeshotsav) कोल्हापुरात महा स्वरूप यायला इसवी सन 1978 पासून प्रारंभ झाला. जनसेवा संघटनेचे तत्कालीन संस्थापक बाबुराव धारवाडे यांनी गणेशोत्सव मंडळांच्या देखावा स्पर्धेचे आयोजन सुरू केल्यानंतर गणेशोत्सवातील चुरस वाढली. त्यानंतर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव खऱ्या अर्थाने रस्त्यावर आला. रस्त्यावर मंडप उभारले जाऊ लागले.
त्याच्या आधी शहरातील तरुण मंडळ तसेच तालीम संस्था यांच्या वास्तूमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली जायची. चित्तवेधक सजावट, विद्युत रोषणाई, विद्युत संगीत सिस्टीम, तांत्रिक देखावे त्याचबरोबर सजीव देखावे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कडून मांडले जात असत. सजीव देखावे म्हणजे एक प्रकारच्या अर्ध्या तासाच्या एकांकिकाच असायच्या. राजकीय, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक आदी विषयांवर देखावे तयार केले जात असत. आता त्यालाही भव्यतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून कोल्हापूर शहरात देखावे पाहण्यासाठी खुले केले जात नसत. शेवटच्या तीन दिवसात अवघे कोल्हापूर रस्त्यावर उतरायचे. आजही त्यात खंड पडलेला नाही.
सार्वजनिक गणेशोत्सवाला महास्वरूप येण्यापूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकांना एक मार्ग निश्चित केलेला नसायचा. कोणत्याही रस्त्यावरून मिरवणूक निघायची. ती पाहायला लोक रस्त्यावर सुद्धा यायचे नाहीत. मात्र तेव्हा शिवाजी पेठेतील तथाकडील तालीम मंडळाची गणेश विसर्जनाची मिरवणूक भव्य असायची. ती पाहण्यासाठी रात्री लोकांची गर्दी व्हायची. या मंडळाचा गणपती रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीत विसर्जित व्हायचा.
गेल्या 40 वर्षात कोल्हापूर शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत बदल होत गेले. मिरवणुकीसाठी एकच मार्ग निश्चित करण्यात आला. डॉल्बी, डीजे, या साऊंड सिस्टीम तेव्हा नव्हत्या. 1985 च्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दिलबहार तालीम मंडळाने पहिल्यांदा पुणे येथून संगम झांज पथक आणले होते. ते पाहण्यासाठी तुफान गर्दी व्हायची. आत्ता त्याची जागा ढोल वादक पथकाने घेतले आहे.
इसवी सन 1982 मध्ये शहरात शिवाजी चौकात 21 फूट उंचीची गणरायाच्या मूर्तीची पहिल्यांदा प्रतिष्ठापना करण्यात आली. आता अनेक मंडळांच्या कडून सर्वाधिक उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. शिवाजी चौक तरुण मंडळ, शिवाजी चौक रिक्षा मंडळ, पूल गल्ली तालीम मंडळ, वगैरे मंडळांनी 21 फूट उंचीच्या श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापित करायला प्रारंभ केला. त्याच्या आधी मित्र प्रेम तरुण मंडळांनी 11 फूट उंचीची नटराजाच्या रूपातील शाडूची मूर्ती बसवली होती.

गेल्या 40 वर्षात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढू लागली आणि गणेशोत्सवाला भव्यता प्राप्त झाली. पूर्वी पारंपरिक वाद्यांना विसर्जन मिरवणुकीत प्राधान्य असायचे. गेल्या काही वर्षात आरोग्यास हानिकारक असणाऱ्या ध्वनी यंत्रणा वापरल्या जाऊ लागल्या. डॉल्बी, डीजे आणि लेसर किरणे यामुळे लोकांना त्रास होऊ लागला. म्हणून मग ध्वनी नियंत्रण कायदा कठोरपणे राबवला जाऊ लागला. गणेशोत्सव मंडळांच्या वर गुन्हे दाखल केले जाऊ लागले. साऊंड सिस्टिम यंत्रणा जप्त केली जाऊ लागली.
यंदाही श्री गणेश आगमन मिरवणुकीमध्ये ध्वनी नियंत्रण कायदा कार्यकर्त्यांनी धाब्यावर बसवला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत या कायद्याचे काय होईल असा आत्ताच प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
हेही वाचा :
राहुल गांधींच्या ‘या’ निर्णयामुळे महाआघाडीत पडणार फूट
शाहरुखची लेक सुहाना खान अडचणीत…
आज अनेक शुभ योग; ‘या’ 5 राशींवर गौराईची मोठी कृपा, धनलाभाचे संकेत