“आम्हाला आश्वासन नको, ‘शक्तिपीठ’ रद्द झाल्याचा निर्णय हवा,” अधिकाऱ्यांसमोरच रक्ताने सह्या करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

शक्तीपीठ महामार्गासाठी कोणत्याही शेतकऱ्यावर जबरदस्ती केली जाणार नाही, सध्या केवळ प्राथमिक सर्वेक्षण सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, या आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास नागेवाडीतील शेतकरी तयार नसल्याचे मंगळवारी (दि.९) दिसून आले. “आम्हाला आश्वासन नको, तर प्रकल्प रद्द झाल्याचा निर्णय हवा,” अशी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोरच रक्ताने सह्या करण्याचा निर्धार व्यक्त केला. (administration) त्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले.

खानापूर तालुक्यातील नागेवाडी, माहुली, चिखलहोळ आणि भाग्यनगर परिसरात शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गाचे ड्रोनच्या साहाय्याने मोजमाप करण्यास प्रशासनाने सुरुवात केली. प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश टोंपे, उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह महसूल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणि पोलिस बंदोबस्त संबंधित ठिकाणी उपस्थित होते.ड्रोन सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मिळताच विविध गावांतील शेतकरी घटनास्थळी जमा झाले. (administration) काहींनी माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील तसेच ॲड. दीपक लाड यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. दरम्यान, नागेवाडीत मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत शक्तीपीठ महामार्गाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत अधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया अद्याप दूर असून सध्या फक्त प्राथमिक सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगितले. कोणत्या गटातील किती क्षेत्र बाधित होणार याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “आम्हीही शेतकरी कुटुंबातीलच आहोत. कोणावरही अन्याय किंवा जबरदस्ती होणार नाही. शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवू,” असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

भूमिहीन करणारा शक्तिपीठ आम्हाला नको मात्र, शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला. “गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सर्वेक्षणासाठी कोणी येते का, यासाठी गावागावांत गस्त घालावी लागत आहे. आम्ही रक्ताने सह्या करू, पण सुपीक जमीन महामार्गासाठी देणार नाही,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.नागेवाडीप्रमाणेच माहुली, भाग्यनगर आणि चिखलहोळ येथेही शेतकरी व मोजणी पथकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे समोर आले आहे. (administration) काही ठिकाणी सर्वेक्षणाचे काम तात्पुरते थांबविण्यात आल्याची माहिती मिळाली. नागेवाडी परिसरात तणाव वाढल्याने महसूल विभागाने अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.दरम्यान, शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या ड्रोनद्वारे सुरू असलेल्या सर्वेक्षणाला काही काळासाठी अडथळा निर्माण झाल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले.

हेही वाचा :

पैशाच्या वादातून मुकादमाचे अपहरण

जिल्ह्यात ‘गांजा’ची शेती, तस्करी जोमात

महापालिकेच्या कारवाईत राज्य शासन हस्तक्षेप करू शकत नाही