सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि मोबाइल गेम्सचे व्यसन हे आजच्या समाजासमोर (addiction) गंभीर आव्हान म्हणून उभे राहत आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊन तीन बहिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती, तर मध्य प्रदेशची राजधानी भोपाल येथेही मोबाइल गेमच्या व्यसनामुळे एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली. अशा प्रकारच्या घटना केवळ वेगवेगळ्या शहरांपुरत्या मर्यादित नसून देशभरातून अशाच अनेक प्रकरणांची नोंद होत आहे. त्यामुळे मुलांचा दोष आहे की सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्मची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की वापरकर्ते त्यात जास्तीत जास्त वेळ घालवतील, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.

अमेरिकेतही या संदर्भात कायदेशीर (addiction) लढाया सुरू आहेत. कॅलिफोर्नियामध्ये दाखल झालेल्या एका महत्त्वाच्या खटल्यात सोशल मीडिया कंपन्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. Meta Platforms या कंपनीच्या मालकीची Instagram आणि Facebook तसेच YouTube या प्लॅटफॉर्म्सची रचना मुलांना व्यसनाधीन बनवेल अशा पद्धतीने केल्याचा दावा करण्यात आला आहे. कॅली जीएम नावाच्या 20 वर्षीय तरुणीने दाखल केलेल्या याचिकेत तिने लहान वयात या प्लॅटफॉर्मचा वापर सुरू केल्यानंतर मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागल्याचे म्हटले आहे. या खटल्याचा निकाल अमेरिकेत सुरू असलेल्या शेकडो तत्सम प्रकरणांवर परिणाम करू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोशल मीडिया आणि गेमिंग अॅप्समध्ये वापरकर्त्यांचे लक्ष वेधून ठेवण्यासाठी विशेष तंत्रांचा वापर केला जातो. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, लाइक्स, रील्स आणि लेव्हल्स पूर्ण करण्याची स्पर्धा यामुळे मुलांचे लक्ष दीर्घकाळ स्क्रीनकडे खिळून राहते. याचा परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो. सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर ताण, झोपेच्या समस्या आणि चिडचिड वाढते. लहान वयात मेंदूचा विकास वेगाने होत असताना जास्त स्क्रीन टाइममुळे एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.
मोबाइलचा अतिवापर मुलांच्या सामाजिक (addiction) आणि भावनिक विकासालाही बाधा पोहोचवू शकतो. प्रत्यक्ष संवाद, मैदानी खेळ आणि कुटुंबासोबत घालवलेला वेळ कमी झाल्यास मुलांची संवादकौशल्ये आणि भावनिक समतोल बिघडू शकतो. इंटरनेटवरील अयोग्य मजकूर किंवा हिंसक गेम्समुळे त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. तज्ज्ञांच्या मते, मुलांशी संवाद ठेवणे, त्यांच्या ऑनलाइन सवयी समजून घेणे आणि प्रेमाने मर्यादा घालणे आवश्यक आहे. रागावणे किंवा अचानक फोन काढून घेणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. त्याऐवजी मुलांना खेळ, वाचन, कला, संगीत यांसारख्या सर्जनशील उपक्रमांकडे वळवणे अधिक परिणामकारक ठरू शकते. तंत्रज्ञान पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी त्याचा संतुलित आणि जबाबदारीने वापर करणे हीच काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा :
घरात हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी, नियम आणि फायद्यांबद्दल माहिती आहेत?
या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार