कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : एक प्रभाग, एक सदस्य ही पारंपारिक निवडणूक(election) पद्धत सर्वांच्या सवयीची आणि सोयीची होती. शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचणे इच्छुक उमेदवाराला सहज शक्य होते. आता ही पद्धत खंडित करून चार सदस्य पॅनल सिस्टीम पुढे आणली आहे. त्यामुळे प्रभागाचा भूगोल बदलला आहे. पॅनल सिस्टीम साठीची प्रभाग रचना बुधवारी जाहीर झाली. प्रत्येक प्रभाग हा कमीत कमी 25 हजार मतदारांचा असल्यामुळे निवडणुकीत उतरणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी विजयाचे गणित अवघड असणार आहे.

यापूर्वी प्रत्येक मतदारसंघाला नाव दिले असायचे. (उदाहरणार्थ महालक्ष्मी मंदिर परिसर.) पण आता प्रत्येक प्रभाग हा क्रमांकावरून ओळखला जाणार आहे. कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 20 प्रभाग असणार आहेत आणि विसावा मतदारसंघ हा पाच जणांचा असणार आहे. महापालिकेच्या नव्या सभागृहात एकूण 81 सदस्य असणार आहेत.

एक सदस्य पद्धती असताना प्रभागातील मतदारांची संख्या साडेचार हजार पासून 7हजार पर्यंत असायची. निवडणूक(election) लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला शेवटच्या मतदारापर्यंत अगदी सहजरीत्या पोहोचता येत होते. पण आता प्रत्येक प्रभाग हा 25 ते 27 हजार मतदारांचा असणार आहे.

पूर्वीच्या प्रभागाच्या तुलनेत नवीन प्रभागाच्या कक्षा फारच विस्तारलेल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रभागात जाऊन पोहोचण्याचे, तेथे अनुकूल वातावरण तयार करण्याचे, ज्या त्या भागातील कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी करण्याचे, प्रभागाच्या विकासाचे मॉडेल बनवण्याचे आव्हान उमेदवारांना पेलावे लागणार आहे. महापालिका निवडणुकांवर पैशाचा प्रचंड प्रभाव आहे आणि असतो. त्यामुळे धनदांडगेच निवडणुकीत उतरतात. सामान्य कार्यकर्ता मात्र निवडणूक लढवण्याचा मनात विचार सुद्धा करू शकत नाही हे आजचे वास्तव आहे.

प्रत्येक प्रभाग मोठा असल्यामुळे निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या इच्छुकांचा राजकीय पक्षांकडून प्राधान्याने विचार केला जाणार आहे. गेल्या सभागृहातील सदस्यांकडे निवडून येण्याची पात्रता असलेले उमेदवार म्हणून पाहिले जाणार आहे. आणि म्हणूनच माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्याची चुरस आता वाढीस लागणार आहे.

चार सदस्य पॅनल सिस्टीम असल्यामुळे मतदारांचा “भाव” वाढलेला आहे. गल्लोगल्लीतील कार्यकर्त्यांनी आपली किंमत आतापासून “निश्चित” करायला सुरुवात केली आहे. परिणामी उमेदवारांसाठी ही निवडणूक(election) महा खर्चिक असणार आहे. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आणि दीपोत्सव हे तीन महत्त्वाचे सण ओळीने येत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला या सण उत्सवांची पार्श्वभूमी आहे.

इच्छुक उमेदवारांच्या खर्चाला गणेशोत्सवापासूनच सुरुवात झालेली आहे. प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री आरती साठी इच्छुक उमेदवारांना निमंत्रण दिले जाऊ लागले आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्र उत्सव तोंडावर आहे,पाठोपाठ दीपावली आहे. आणि दीपावली नंतरच निवडणूक येत असल्यामुळे इच्छुक उमेदवारांना आपले हात सैल सोडावे लागणार आहेत.

हेही वाचा :

इलेक्ट्रिक वाहनांना 100 टक्के टोलमाफी….

अजित पवारांनी धमकी दिलेली ‘ती’ IPS अधिकारी कोण…

जलवाहिनीच्या खड्यात बुडून मुलाचा मृत्यू….