डी. के. ए. एस. सी. कॉलेज, इचलकरंजी येथे संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली प्रभावी भाषणे सादर केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य खाडे यांनी आपल्या मनोगतात संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की, “श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रवासात संस्थामातांचे योगदान अतुलनीय आहे. संस्थेच्या निर्मितीपासून ते आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत संस्थेच्या प्रत्येक घटकाला त्यांनी स्वतःच्या लेकराप्रमाणे जपले. या वक्तृत्व स्पर्धेद्वारे त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो आणि विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञतेची भावना दृढ होते.”
स्पर्धेचे परीक्षण प्रा. निलेश जाधव व प्रा. संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थना आणि प्रतिमापूजनाने झाली. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक वाङ्मय मंडळ समन्वयक प्रा. रोहित शिंगे यांनी केले.
या प्रसंगी दुपार सत्र प्रमुख प्रा. डी. ए. यादव, सकाळ सत्र प्रमुख प्रा. व्ही. पी. पाटील, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. पी. ए. पाटील, तसेच मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंजली उबाळे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. अर्चना नंदगावे यांनी व्यक्त केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. अपर्णा कांबळे आणि प्रा. प्रथमेश गवळी यांच्यासह वाङ्मय मंडळातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले. या विशेष प्रसंगी गुरुदेव कार्यकर्ते, प्राध्यापकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणांची मांडणी केली. या स्पर्धेमुळे संस्थेच्या परंपरेची आणि मूल्यांची पुन्हा एकदा उजळणी झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.