मागील महिन्यात केंद्र सरकारने रिअल-मनी गेमिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर 2023 पासून टीम इंडियाच्या जर्सीचा(jersey) प्रमुख प्रायोजक असणाऱ्या ड्रीम 11 भोवती अनिश्चितता निर्माण झाली. परिणामी बीसीसीआयने ड्रीम 11 सोबत जर्सी स्पॉन्सरशिपचा करार संपुष्ठात आणून नव्या जर्सी स्पॉन्सरच्या शोधाला सुरुवात केली होती.

टीम इंडियाची जर्सी(jersey) स्पॉन्सर करण्यासाठी अनेक कंपन्यांनी बीसीसीआयकडे अर्ज केल्याच्या बातम्या होत्या. अखेर बीसीसीआयने टीम इंडियाचा नवा जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो टायर्स ची निवड केली आहे. बीसीसीआयने अद्याप याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली नसली तरी मीडिया रिपोर्ट्समधून याबाबतच्या बातम्या समोर आल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार आता अपोलो टायर्स हे टीम इंडियाचे नवे स्पॉन्सर असणार असून हा करार पुढील तीन वर्षांसाठी असेल. यात टीम इंडियाचे जवळपास 21 आयसीसी सामने आणि 121 द्विपक्षीय सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू अपोलो टायर्स या नव्या स्पॉन्सरचं नाव असलेली जर्सी घालतील. अपोलो टायर्सने बीसीसीआय सोबत 579 कोटींची डील केली आहे. रिपोर्ट्सनुसार अपोलो टायर्स टीम इंडियाच्या प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला जर्सी स्पॉन्सर म्हणून 4.5 कोटी रुपये देतील अशी माहिती आहे. ही रक्कम ड्रीम 11 देत असलेल्या स्पॉन्सरशिप रक्कमेपेक्षा जास्त आहे.
टीम इंडियाचे क्रिकेट सामने जगभरात पाहिले जातात त्यामुळे अपोलो टायर कंपनीला जागतिक स्तरावर लक्षणीय दृश्यमानता मिळेल. अपोलो टायर ही वाहनांचे टायर उत्पादन करणारी कंपनी आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय पुरुष संघाकडे कोणताही प्रायोजक नाही, तर महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही प्रायोजकाशिवाय खेळली. मात्र अपोलो टायर सोबत करार झाल्यावर आता 30 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या महिला आयसीसी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया जर्सी स्पॉन्सरचं नाव असणारी जर्सी घालून खेळेल.
हेही वाचा :
31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या
इचलकरंजी पाणीप्रश्नी एक महिन्यात निर्णय न झाल्यास परत जनआंदोलनाचा इशारा