पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून देशाचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे. (results) सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला टपाल मतांची मोजणी केली जाईल, त्यानंतर ईव्हीएममधील मतांची गणना सुरू होईल. पश्चिम बंगालमधील फल्टा मतदारसंघ वगळता उर्वरित सर्व जागांचे निकाल आज स्पष्ट होणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये २९३ जागांसाठी ७७ मतमोजणी केंद्रांवर प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील संवेदनशील राजकीय वातावरण लक्षात घेता सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीपूर्वीच तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये निकालांबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे बंगालमधील निकालांकडे विशेष लक्ष लागले आहे.
आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची आशा आहे. १२६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ७२२ उमेदवार रिंगणात होते. राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ४० केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. ९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात ८५.९६ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली होती.
तामिळनाडूमध्ये सत्ताधारी डीएमके पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र यावेळी एआयएडीएमकेसोबतच विजय यांच्या नेतृत्वाखालील तामिझगा वेट्री कझगम आणि सीमान यांच्या एनटीके पक्षामुळे निवडणुकीत नवी रंगत निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील निकाल उत्सुकतेचे ठरणार आहेत. केरळमधील १४० जागा आणि पुद्दुचेरीतील ३० जागांसाठीही आज सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. या पाच राज्यांतील निकालांमुळे आगामी राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष आजच्या दिवसाकडे लागले आहे.
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?