गुजरातमधील राजकोटमध्ये फेसबुक पोस्टवरून झालेल्या वादात एका 20 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या (Murder)करण्यात आली. प्रिन्स असं या पीडित तरुणाचं नाव असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्याची प्रकृती बिघडली. त्याने तक्रार दाखल केली आणि रुग्णालयातूनच पोलिसांकडे जबाब नोंदवला. पण नंतर त्याचा मृत्यू झाला. गुजरात पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे, तर दुसरा फरार आहे.

20 वर्षीय प्रिन्स कुमार हा मूळचा बिहारचा रहिवासी होता. आपल्या तीन चुलत भावांसोबत गुजरातमधील एका कारखान्यात तो काम करत होता. त्याचे आजोबा रूपनारायण भिंड यांचं चार महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. त्यांच्या आठवणीत प्रिन्सने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. प्रिन्सचा बिहारमधील ओळखीचा बिपिन कुमार राजिंदर गोंड याने या पोस्टवर हसणारा इमोजी टाकला. या इमोजीवरुन दोघांमध्ये वाद झाला. फोनवरुन सुरु झालेला हा शाब्दिक वाद नंतर हाणामारीत रुपांतरित झाला.

एफआयआरनुसार, 12 सप्टेंबरच्या रात्री, 12.30 च्या सुमारास प्रिन्स ज्या कारखान्यात काम करत होता त्या कारखान्याबाहेर ऑटो रिक्षात बसला होता तेव्हा त्याने बिपिनला त्याच्याकडे येताना पाहिले. प्रिन्स कारखान्यात जाण्यासाठी वळला, परंतु दुसरा आरोपी ब्रिजेश गोंड याने त्याचा रस्ता अडवला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यादरम्यान, बिपिनने प्रिन्सवर चाकूने वार केले.
प्रिन्सच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे सहकारी मदतीला धावले आणि त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात घेऊन गेले. नंतर त्याला राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, प्रिन्सच्या पाठीवर दीड ते दोन इंच खोल जखम झाली होती. तथापि, रुग्णालयात दाखल होताना तो शुद्धीवर होता आणि त्याने पोलिसांना जबाब दिला.

प्राथमिक वैद्यकीय अहवालात त्याची दुखापत गंभीर असल्याचं म्हटले नव्हतं. परंतु चार दिवसांनंतर त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आलं. 22 सप्टेंबर रोजी पहाटे 2.30 वाजता प्रिन्सचा मृत्यू झाला. सकाळी 6.35 ला पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत हत्येशी (Murder)संबंधित कलम 103 (1) एफआयआरमध्ये जोडला. मुख्य आरोपी बिपिनला सोमवारी रात्री अटक करण्यात आली आणि मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दुसरा आरोपी ब्रिजेश फरार आहे. मृत्यूचं नेमकं कारण निश्चित करण्यासाठी पोलिस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. प्राथमिक अहवालात जखमा आणि संसर्ग दोन्ही संभाव्य कारणे असू शकतात असं मनूद कऱण्यात आलं आहे.
हेही वाचा :
विकी – कतरिनाच्या गोड बातमीवर अक्षयची कमेंट…
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत; अजित पवार….
फव्वारा आला अन् एका क्षणातच ताईंना उडवून घेऊन गेला… Video Viral