पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट सामन्यांवरून पुन्हा एकदा राजकारण(Politics) तापले आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत तीव्र नाराजी व्यक्त केली.“आपल्या देशातील सैनिक शहीद झाले, निरपराध नागरिक मारले गेले, पहलगामसारख्या हल्ल्यांमध्ये मातांचे कुंकू पुसले गेले, तरी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली जाते. पंतप्रधान म्हणतात ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’, मग ‘रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं?’” असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

दादर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कबूतरांसाठी, कुत्र्यांसाठी आणि हत्तीणीसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात, ही चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा देशातील सैनिक शहीद होतात, निष्पाप नागरिकांचे प्राण जातात, तेव्हा अशीच माणुसकी कुठे जाते?

त्यांनी थेट केंद्र सरकारवर टीका करत विचारलं, “पहलगाम हल्ल्याला अजून 2-3 महिनेही झाले नाहीत. त्या घटनेनंतर ‘गरम सिंदूर’ची भाषा करणारे आता क्रिकेटसाठी थंड का झाले? की तो गरम सिंदूर आता कोल्ड्रिंक झाला?”

ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर थेट शब्दांत टीका केली. त्यांनी सांगितलं की, शौर्य दाखवणाऱ्या महिला अधिकारी सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजप नेत्यांनी अपमानास्पद वक्तव्य केलं. “या भाजपवाल्यांची मजल इतकी गेली की, त्यांनी कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण म्हणण्यापर्यंत शब्द वापरले. तरीही हेच लोक आज मंत्री म्हणून डोक्यावर बसले आहेत. देशभक्तीचं थोतांड गाताना त्यांना लाज वाटत नाही,” असं ठाकरे म्हणाले.

“पाकिस्तानविरुद्ध जगभर शिष्टमंडळ पाठवून ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. पण एकाही देशाने आपल्याला उघड पाठिंबा दिला नाही. मग आता त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं म्हणजे जगाला काय दाखवणार आहोत? पहिलं शिष्टमंडळ खोटं बोललं की आता दुसरं खरं सांगणार?” असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

त्यांनी थेट पंतप्रधान आणि केंद्रीय नेतृत्वावर आरोप करत विचारलं, “देशापेक्षा जय शाह मोठा आहे का? त्याच्यासाठी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलं जातंय का? शहीद सैनिक आणि नागरिकांच्या बलिदानापेक्षा क्रिकेटचा व्यवसाय मोठा आहे का?”

उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्हाला खेळ महत्त्वाचा वाटतो, पण देश त्याहूनही महत्त्वाचा आहे. आज मात्र देशापेक्षा क्रिकेट आणि त्यामागचा पैसा मोठा मानला जातोय, हेच देशाचं दुर्दैव आहे. ही बोगस जनता पक्षाची मंडळी देश डोक्यावर बसवली, ही खरी शोकांतिका आहे.”त्यांच्या या विधानांमुळे पुन्हा एकदा क्रिकेट–राजकारण(Politics)–देशभक्ती या वादाला उधाण आले असून, पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळायचा की नाही या प्रश्नावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा :

“१४ वर्षीय मुलाकडून १० वर्षांच्या मुलीचा खून; थरकाप उडवणारी घटना”
“शारीरिक संबंधाची मागणी प्रकरणी काँग्रेस आमदारावर वादळ”
कर्ज काढलं, आईने वडिलांना दिलं लिव्हर… दोघेही दगावले